धक्कादायक! मच्छर मारण्याचा स्प्रे तोंडात मारून नवऱ्याला केलं ठार

सामना ऑनलाईन । हैदराबाद

हैदराबादमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रियकरासाठी एका महिलेने नवऱ्याच्या तोंडात मच्छर मारण्याचा स्प्रे कोंबला आणि तो मरेपर्यंत स्प्रे करत राहिली. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. जगन असं मृत इसमाचे नाव असून तो एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. या प्रकरणी पोलिसांनी जगनची पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

हैदराबाद येथील बंजारा हिल्स परिसरातील फिल्म नगरमध्ये पत्नीने नवऱ्याची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे. दारूड्या नवऱ्यापासून सुटका व्हावी आणि प्रियकरासोबत संसाराची स्वप्ने रंगवणाऱ्या महिलेने असा काही प्लॅन रचला की, सराईत गुन्हेगारही थक्क होतील. सोमवारी रात्री जगन तर्राट होऊन घरी आला आणि त्याचे पत्नीशी जोरदार भांडण झाले. जगन दारूच्या नशेत असल्याचा फायदा घेत तीने मच्छर मारण्यासाठी आणलेला स्प्रे त्याच्या तोंडात कोंबला आणि तो मरेपर्यंत त्यांच्या तोंडात स्प्रे करत राहिली. विषारी स्प्रे तोंडात कोंबल्याने जगनचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, जगनच्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध होते आणि त्यात पती अडसर ठरत असल्याने त्याचा काटा काढल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी जगनची पत्नी आणि तिच्या प्रियकरालाही पोलिसांनी अटक केली आहे.