शारीरिक संबंधास नकार दिल्याने बायको आणि ३ महिन्यांच्या मुलीची क्रूरपणे हत्या

सामना ऑनलाईन, कोपरगाव

शारीरिक संबंधाला नकार दिल्याने गणेश खरात ( वय-३० वर्ष) याने बायकोला कुऱ्हाडीचे वार करून ठार मारले. बायकोच्या शेजारीच गणेशची ३ महिन्यांची मुलगी झोपली होती. आपल्याला अटक झाल्यानंतर या मुलीचं काय होणार या विचाराने वैतागलेल्या गणेशने बायकोपाठोपाठ त्या मुलीलाही कुऱ्हाडीचे वार करत मारून टाकले. दोन हत्या केल्यानंतर गणेश थंड डोक्याने स्वत: पोलिसांसमोर हजर झाला आणि त्याने पोलिसांना हत्येची माहिती दिली. गणेश आणि त्याची बायको यांना एकूण ३ अपत्ये होती, यातील ३ आणि ५ वर्षांची मुले सासूसोबत झोपली असल्याने बचावली आहेत.

कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक १ मध्ये ही घटना घडली असून गणेश याने त्याच्या सासूवरही हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये रुक्मिणी गवई या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी शिर्डीतील साईनाथ हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. गणेशने बायको आणि मुलगी झोपलेली असताना त्यांना ठार मारले असा पोलिसांना संशय आहे. या गुन्हाबद्दल कळताच शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक डॉ.सागर पाटील, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी तातडीने घटनास्थळ गाठले आणि तपासाला सुरुवात केली.