लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये आता वायरलेस इंटरनेट

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

लांब पल्ल्यांच्या गाडय़ांमधील प्रवास आता मनोरंजक होणार आहे. या गाडय़ांमध्ये वायरलेस इंटरनेटची सुविधा बसविण्याचा निर्णय रेल्वेने घेतला असून व्हायकॉम १८, जी, हंगामा आणि शेमारो या कंपन्यांमार्फत तब्बल तीन हजार रेल्वे गाडय़ांमध्ये हिंदुस्थानमधील विविध भाषांतील चित्रपट, व्हिडीओ पाहता येणार आहे.

‘नॉन फेयर रेव्हेन्यू सेल’ अंतर्गत हिंदुस्थानी रेल्वेने लांब पल्ल्यांच्या गाडय़ांमध्ये व्हिडीओ सिस्टीम बसविण्याचा रेल्वेचा विचार आहे. यात जवळपास सर्वच हिंदुस्थानी भाषांमधील चित्रपट पाहता येतील. या सिस्टीमद्वारे प्रवाशांना आपल्या मोबाईल फोनवरही व्हिडीओ पाहता येतील. त्यासाठी प्रवाशांना रेल्वेच्या वाय-फाय नेटवर्कवर लॉगइन करणे आवश्यक आहे.

कंपन्यांमध्ये लागणार बोली

रेल्वेमध्ये व्हिडीओ सिस्टीम बसविण्यासाठी व्हायकॉम १८, जी, हंगामा, शेमारो या कंपन्यांमध्ये बोली लागणार असल्याची माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली. ही बोली सप्टेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. या व्हिडीओ सिस्टीममधून रेल्वेला वार्षिक सुमारे ५०० कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. ही सिस्टीम बसविण्यासाठी सुमारे २४ कंपन्या पुढे आल्या असून जी कंपनी बोली जिंकेल तिला हे सिस्टीम बसविण्याचे कंत्राट मिळणार आहे. हे कंत्राट पाच वर्षांचे असेल.