पाळीव प्राण्यांवर वन्य प्राण्यांचा हल्ला, हटरकवाडी परिसरामध्ये भीतीचे वातावरण

सामना प्रतिनिधी । मानवत

मानवत तालुक्यातील हटरकवाडी येथे एका अज्ञात वन्य प्राण्याने एका म्हशीच्या वगारुवर आणि एका कुत्र्यावर हल्ला चढविला. यात दोघांचाही बळी गेला आहे. या घटनेमुळे हटरकवाडी परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून हा हल्ला कोणत्या वन्य प्राण्याने केला असावा याबद्दलची चर्चा होत आहे. विशेष म्हणजे वनविभाग या घटनेबद्दल अनभिज्ञ आहे.

मानवत तालुक्यातील हटकरवाडी येथे एका वन्य प्राण्याने दोन प्राण्यांवर जोरदार हल्ला चढवल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. हटकरवाडी येथील शेतकरी संदीप बाळासाहेब जोरवर यांच्या शेतात वन्य प्राण्याने एका म्हशीचे वगारु आणि कुत्र्यावर प्राणघातक हल्ला केला. हा हल्ला वाघानेच केला असावा, असा संशय ग्रामस्थांकडून व्यक्त केला जात आहे. एवढी मोठी घटना होऊनही एकही वनविभागाचा अधिकारी किंवा कर्मचारी गावाकडे फिरकलाच नाही. या संपूर्ण घटनेबद्दल परभणी येथील वनविभाग अनभिज्ञ असल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान, हा हल्ला कोणी केला, याबद्दल हटकरवाडी परिसरामध्ये उलट-सुलट चर्चेला उधाण आले असून वनविभाग या संदर्भात काय खुलासा करणार याकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे.

परभणी वनविभाग मात्र अनभिज्ञ
या संदर्भात परभणी येथील वनविभागाशी दुरध्वनीवरुन संपर्क साधला असता, परभणी येथील सर्वच अधिकारी व कर्मचारी हे कार्यशाळेच्या निमित्ताने हिंगोली येथे गेले आहेत. वरिष्ठ अधिकारी मंडळी आल्यानंतर मानवत तालुक्यातील हटकरवाडी येथील घटनेची चौकशी करणार असल्याचे सांगीतले. या घटनेची सत्यता पडताळून पाहत असताना वनविभागाच्या उपस्थितीत अधिकारी व कर्मचाऱ्यांना ही घटनाच घडलेली माहितच नव्हती.