संभाजी ब्रिगेड पक्षाची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार-गायकवाड

116

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

संभाजी ब्रिगेड पक्षाची मान्यता रद्द करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडे आपण तक्रार करणार आहोत, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी आज, रविवारी मनपाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षपदी प्रवीण गायकवाड यांची निवड झाल्यानंतर त्यांनी संघटनेच्या राज्यभर विभागवार बैठका आयोजित केल्या आहेत. संभाजीनगर विभागाच्या बैठकीसाठी गायकवाड आज, रविवार शहरात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. याप्रसंगी प्रदेश कार्याध्यक्ष शांताराम कुंजीर, सचिव आत्माराम शिंदे, उपाध्यक्ष छगन शेरे, राहुल बनसोड, संघटक सोमेश्वर आहेर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

संभाजी ब्रिगेड ही समाजासाठी काम करणारी सामाजिक संघटना आहे. या संघटनेचे राजकीय पक्षात रूपांतर करणे हे प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर ९० टक्के कार्यकर्त्यांचा विरोध होता, असे असताना काही मंडळीच्या आग्रहाखातर सामाजिक संघटनेचे राजकीय पक्षात रूपांतर करण्यात आले. पक्षाच्या बॅनरखाली निवडणुकाही लढल्या गेल्या, यश आले नाही, ज्यांनी पक्षाकडून निवडणुका लढविल्या त्यांना पश्चात्ताप होत आहे, पक्षाने कुठलेही सहकार्य केले नाही, असे निवडणूक लढविणाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत, हे असे स्पष्ट करून प्रवीण गायकवाड पुढे बोलताना म्हणाले, संभाजी ब्रिगेड संघटनेची धर्मादाय आयुक्तांकडे नोंद असलेल्या संघटनेचे आपण आजही अध्यक्ष आहोत, संघटनेचा लोगो, श्लोगन, घोषणा त्याच आहेत, याचा कोणी गैरवापर करत असेल तर त्याविरोधात धर्मादाय विभागाच्या नोंदीनुसार अध्यक्ष म्हणून आपणास तक्रार करता येते, म्हणून आम्ही निवडणूक आयोगाकडे पक्षाची मान्यता रद्द करण्याची मागणी करणार आहोत, असेही ते म्हणाले. संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य चालू राहणार, असेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या