पतसंस्थेच्या मालमत्तांचा लिलाव करून ठेवीदारांची देणी देणार!

सामना ऑनलाईन । मुंबई

राज्यातील दिवाळखोरीत निघालेल्या पतसंस्थांकडील मालमत्तांचा लिलाव करून ठेवीदारांची देणी देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी विधानसभेत दिली.

विधानसभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विजय वडेट्टीवार यांनी लक्षवेधीद्वारे राज्यातील बिगरशेती सहकारी पतसंस्थांकडे ठेवीदारांच्या कोटय़वधीच्या ठेवी अडकल्या आहेत. या ठेवींची रक्कम परत करण्याच्या दृष्टीने कोणतीही कार्यवाही केली जात नाही. ११ लाख २३ हजार ठेवीदारांचे १ हजार ६३२ कोटी रुपये अडकले आहेत. याबद्दल सरकारने कोणती कार्यवाही केली अशी विचारणा केली.

यावर सहकारमंत्री सुभाष देशमुख म्हणाले की, राज्यात २००७ साली डबघाईला आलेल्या ४६९ पतसंस्थांमध्ये सुमारे १५ लाख १२ हजार ७८७ ठेवीदारांच्या १८७० कोटी ६५ लाखांच्या ठेवी होत्या. त्यापैकी डिसेंबर २०१७ अखेर ७ लाख ९७ हजार ५०८ ठेवीदारांना ११५७ कोटी ७१ लाखांच्या ठेवी परत करण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले. ४६९ पतसंस्थांपैकी १५७ पतसंस्थांच्या २६७८ संचालक व पदाधिकाऱयांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यापैकी १४३७ जणांना अटक करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.