…तर केजरीवालांविरोधात उपोषण करेन – अण्णा हजारे

सामना ऑनलाईन । नगर

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी मंगळवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप खरे ठरले तर त्यांच्या राजीनाम्यासाठी उपोषणाला बसेल असं म्हटलं आहे. मात्र केजरीवाल यांच्यावर दिल्लीचे माजी मंत्री कपिल मिश्रा यांनी हे आरोप पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर केल्याने त्यात किती तथ्य आहे हे पाहणे महत्त्वाचे असल्याचे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.

भ्रष्टाचाराविरोधात देशभर आंदोलनाचे बिगूल फुंकणारे अण्णा हजारे यांनी म्हटले की, माजी मंत्र्यांनी केजरीवाल यांच्याविरोधात जे आरोप केले आहेत ते पक्षातून उचलबांगडी केल्यानंतर केले आहेत. ज्यावेळी पैशांची देवाण-घेवाण होत होती तेव्हा लाचलुचपत अधिकाऱ्यांना सूचित का करण्यात आलं नाही? असा प्रश्न अण्णा हजारे यांनी उपस्थित केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी आणि जर या आरोपांमध्ये तथ्य असल्यास केजरीवाल यांच्याविरोधात जंतर-मंतरवर उपोषणाला बसून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करेन, असंही अण्णा म्हणाले.

याआधी सोमवारी अण्णा हजारे यांनी कोणताही मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये दोषी आढळल्यास त्याला फासावर लटकवण्यात यावं असं म्हटलं होतं.