मी फोकनाड नेता नाही, जे बोलतो ते करून दाखवतो: नितीन गडकरी

सामना प्रतिनिधी । लातूर

पाण्याची समस्या हे आमचे पाप नाही, तर ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारचे पाप आहे. नदीजोड प्रकल्प सुरुवात करण्यात आलेला आहे. मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न त्यातून सोडवणारच असा निर्धार केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर मी फोकनाड नेता नाही, जे बोलतो ते करतो आणि जे करू शकतो तेच बोलतो असेही त्यांनी सांगितले. लातूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारासाठी येथील हनुमान चौकात आयोजित करण्यात आलेल्या सभेत नितीन गडकरी बोलत होते.

नितीन गडकरी यांनी सांगितले की, यापुर्वीच्या सरकारांनी मराठवाड्यातील पाण्याची समस्या सोडवली नाही, त्यामुळेच मराठवाड्याचे वाळवंट झालेले आहे. स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक सत्ताही काँग्रेसकडेच होती त्यांनी पाण्यासाठी प्राथमिकता दिली नाही. 70 हजार कोटी रुपयांची विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला परंतु सिंचनासाठी पैसा उपलब्ध करून दिला नाही. 10 टक्के अ‍ॅडव्हान्स घेऊन सिंचनाची कामे मंजूर केली. परंतु सर्व कामे अर्थवट स्थितीत राहिली. राज्यातील 26 कामांना केंद्र शासनाने मदत केली, त्यात मराठवाड्यातील 4 कामांचा समावेश होता. देशाच्या इतिहासात प्रथम केंद्राने राज्याला 40 हजार कोटी रुपये सिंचनासाठी योजना पूर्ण करण्यासाठी दिले असेही त्यांनी सांगितले.

मराठवाड्यातील जायकवाडी कधीच भरले जात नाही. परंतु आता नदीजोड प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. गोदावरीवरील सर्व धरणे भरली जातील, त्यामुळे मराठवाड्यातील पाण्याची समस्या सुटेल, मराठवाडा सुजलाम सुफलाम होईल. मी मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न सोडवणारच असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.