राज्यात आमच्या 48 जागा येऊ शकतात – प्रकाश आंबेडकर

111

सामना ऑनलाईन | मुंबई

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला अवघे काही तास बाकी आहेत. त्यापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आमच्या राज्यात सर्व च्या सर्व 48 जागा येऊ शकतात असे विधान केले आहे. तसेच ईव्हीएम हॅक झाले नाही तर असे होऊ शकते असे म्हणत त्यांनी इतर विरोधी पक्षांप्रमाणे इव्हिएमचा राग आळवला आहे. ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे विधान केले आहे.

लोकसभा निवडणुकीत राज्यात वंचित बहुजन आघाडीचा फॅक्टर मोठा परिणामकारी राहिला. त्यांच्या सभांना अनेक ठिकाणी मोठी गर्दी दिसून आली. परंतु विविध एक्झिट पोलमध्ये राज्यात एकाही ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार विजयी होणार नसल्याचे अंदाज वर्तविण्यात आले आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांना मात्र आपण 48 जागांवर विजयी होणार असल्याचा ठाम विश्वास आहे.

आंबेडकर पुढे म्हणाले, लोकशाहीमध्ये निवडणुका येत राहतील. जय-पराजय होत राहतील. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता पक्षाचे कार्य सातत्याने सुरू ठेवावे, जनसामान्यांशी नाळ जोडून ठेवावी, असे निर्देश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.

दरम्यान, गेल्या दीड महिन्या पासून सुरू असलेल्या 17 व्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाची वेळ जवळ आली आहे. उद्या 23 मे रोजी मतमोजणीला सुरुवात होणार आहे. एक्झिट पोलमध्ये एनडीएला सर्वाधिक जागा मिळतील असा अंदाज असला तरी उद्या दुपारपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल.

आपली प्रतिक्रिया द्या