युतीचे वादळ दिल्लीचे तख्त काबीज केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा निर्धार


सामना प्रतिनिधी । परभणी

घों…घों… घोंगावणार्‍या तुफानी वादळातही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची परभणीच्या मैदानावर आयोजित सभा आज तुफान यशस्वी झाली. ‘निसर्ग आज आपली परीक्षा बघतो आहे. देशाचीही सध्या परीक्षाच सुरु आहे. पण आज इथे उठलेले हे युतीचे वादळच उद्या दिल्लीचे तख्त काबीज केल्याशिवाय राहणार नाही.’असा जबरदस्त आत्मविश्वास उद्धव ठाकरे यांनी या सभेत व्यक्त करताच उपस्थित जनसमुदायानेही ‘जय भवानी, जय शिवाजी’चा प्रचंड जयघोष करुन युतीच्या विजयावर जणू शिक्कामोर्तबच केले.

परभणीतील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार संजय उर्फ बंडू जाधव यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन आज सायंकाळी परभणीच्या मैदानावर करण्यात आले होते.

महाराष्ट्रात सध्या जिथे जातोय तिथे असेच वादळ घेऊन फिरतो आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. विरोधकांनी कितीही आघाड्या केल्या, कितीही सभा घेतल्या, महाराष्ट्रात फिरले तरी भगव्याचा हा जल्लोष ते कुठून आणणार आहेत? त्याचवेळी सभास्थानी पून्हा धुळीचे वादळ उठले. या वादळातही तुम्ही थांबणार आहात का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी करताच ‘थांबणार…थांबणार’ असा एकच गलबला केला. या तुफानातही न डगमगता जागेवर बसून असलेल्या शिवसैनिक आणि गर्दीचे कौतुक करताना उद्धव ठाकरे म्हणाले, आता मी भिजलो तरी इथून हलणार नाही. एकदा साथ-सोबत द्यायचं वचन दिलं म्हणजे दिलं. उन, वारा, पावसातही मी तुमच्या सोबत राहणार. हेच तर आपलं वैशिष्ट्य आहे. ही साथ-सोबत आणि हे वादळच उद्या दिल्लीचं तख्त काबीज केल्याशिवाय राहणार नाही. भाजप सोबत केलेली युती तुम्हाला मान्य आहे की नाही, माझा हा निर्णय तुम्हाला पटला आहे की नाही, हा माझा निर्णय महाराष्ट्राच्या, देशाच्या आणि हिंदुत्वाच्या हिताचा आहे की नाही, शेतकर्‍यांच्या हिताचा आहे की नाही, असे प्रश्न उद्धव ठाकरे यांनी करताच प्रत्येक प्रश्नावर ‘हो…हो’चा आवाज गर्दीतून घुमला.

परभणीचं एक वैश्ष्ट्यि आहे. हा मतदार संघ शिवसेनेचा आणि भगव्याचा आणि हिंदुत्वाचा बालेकिल्ला आहे. म्हणून उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना आव्हान दिले की, “ते ५६ पक्ष एकत्र आले आहेत. अरे ५६ पक्षचं काय तुमच्या ५६ पिढ्या खाली उतरल्या तरी या परभणीवरचा भगवा तुम्ही खाली उतरवू शकणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगताच स्टेडियम मैदान टाळ्या आणि शिट्ट्यांच्या आवाजाने दुमदूमून गेले. परभणीच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यात शिवसेनाप्रमुखांनी जी हिंदुत्वाची बीजे पेरली त्याला आज धुमारे फुटले आहेत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.