व्हीनस विल्यम्सला पराभवाचा धक्का

सामना ऑनलाईन । मेलबर्न

ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम या जागतिक स्तरावरील प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी उलटफेर पाहायला मिळाला. गेल्या वर्षी अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या व्हीनस विल्यम्स या अमेरिकेच्या अनुभवी टेनिसपटूला २० वर्षीय बेलिंडा बेनसिसकडून ६-३, ७-५ अशा फरकाने पराभूत व्हावे लागले. गेल्या वर्षी सेरेना विल्यम्स हिच्याकडून पहिल्याच फेरीत पराभूत होणाऱ्या बेलिंडा बेनसिसने व्हीनस विल्यम्सला पहिल्यांदाच हरवत महिला एकेरीत दुसऱ्या फेरीत वाटचाल केली. दरम्यान, महिला एकेरीत कॅरोलिन वोजनियाकी व एलिना स्वितोलिना यांनी प्रतिस्पर्ध्यांना हरवून घोडदौड केली.

नदाल, किर्गीओसचे पाऊल पडते पुढे…
राफेल नदाल व निक किर्गीओस यांनी पुरुषांच्या एकेरीत शानदार कामगिरी आगेकूच केली. राफेल नदालने व्हीक्टर एस्त्रेला बुरगोसचा ६-१, ६-१, ६-१ अशा फरकाने धुव्वा उडवला. राफेल नदालने ९४ मिनिटांमध्ये ८१व्या स्थानावरील व्हीक्टर बुरगोसला हरवले. १७ व्या सीडेड निक किर्गीओसने १०० व्या रँकिंगवरील ब्राझीलच्या रोजेरिओ सिल्वाला ६-१, ६-२, ६-४ असे पराभूत केले.

युकी भांब्रीचे आव्हान संपुष्टात
हिंदुस्थानच्या युकी भांब्रीला पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीतच गारद होण्याच्या नामुष्कीचा सामना करावा लागला. मार्कस बगदातिसने त्याला हरवले. २५ वर्षीय युकी भांब्रीला
६-७,४-६, ३-६ अशा फरकाने हार सहन करावी लागली. दोन तास व नऊ मिनिटे हा सामना रंगला.