विल्सनच्या विद्यार्थ्यांची जवानांना अनोखी सलामी

सामना ऑनलाईन। मुंबई

विल्सन कॉलेजमधील बीएमसीच्या विद्यार्थ्यांतर्फे शनिवारी होप (Hope) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांना विद्यार्थ्यांनी अनोखी सलामी दिली. गिरगाव चौपाटीवर मानवी साखळी तयार करून विद्यार्थ्यांनी शहीद जवानांप्रती आदर व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणविस यांच्यासह अनेक नामवंत उपस्थित होते.

या कार्यक्रमात मुंबईतील ३८५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी चौपाटीवर मानवी साखळी बनवून विद्यार्थ्यांनी अमर जवान ज्योतीची प्रतिकृती तयार केली व जवानांना आदरांजली वाहीली.

दरवर्षी विल्सनमधील बीएमएसचे विद्यार्थी  वेगवेगळ्या थीमवर आधारित सामाजिक उपक्रम करत असतात. याचपार्श्वभूमीवर अर्धांगवायू झालेल्यांचे पुनर्वसन करणाऱ्या पुण्यातील एका संस्थेला या विद्यार्थ्यांनी नुकतीच १ लाख रुपयांची मदत केली.