पडद्यांची शितलता

घराची शोभा वाढवण्याबरोबरच पडदे भिंतींचं सौंदर्यही जपतात. उन्हाळ्यात तर या पडद्यांना विशेष महत्त्व येतं.

घराचं सौंदर्य खुलवणारे, विसावा देणारे, सुरक्षितता जपणारे ‘पडदे’… घरसजावटीत महत्त्वाची भूमिका बजावतात. ऊन आणि प्रकाशापासूनही रक्षण करतात. शिवाय घराची शोभा वाढवण्याबरोबरच भिंतीचं सौंदर्यही यामुळे जपलं जातं. उन्हाळ्याच्या दिवसांत तर या पडद्याचं विशेष महत्त्व. पडद्यांमुळे dदुपारच्या वेळी उजेड आत येतोच, शिवाय सूर्याच्या किरणांपासून घराचं संरक्षणही होतं.

आपण विकत घेत असलेल्या पडद्याच्या कापडाचा पोत, सूर्यप्रकाशात तो पडदा कसा दिसतो, कपडय़ाचा रंग, पोत कसा आहे, दिव्याच्या उजेडात त्याचा रंग कसा दिसतो अशा बऱ्याच बाबींची काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात तसेच इतर वेळी घराच्या सुशोभीकरणाचा महत्त्वाचा भाग असलेल्या पडद्यांचे प्रकार आणि त्यांची काळजी कशी घेता येईल हे पाहूया.

> नेटचे पडदे

उन्हापासून घराचं संरक्षण करण्यासाठी बाजारात नेटचे पांढरे पडदे आले आहेत.  हे पडदे घराची शोभा वाढवण्याबरोबरच घराचं संरक्षणही करतात. असे महागडे पडदे वापरायचे नसतील तर साधारण फिकट, हिरवा, निळा अशा फिकट रंगाचे पडदे लावावेत.

> वाळ्याचा पडदा

दुपारच्या वेळी खिडकीवर किंवा दरवाजावर ओला केलेला टॉवेल किंवा जाड चादर टाकावी. त्यामुळे थंडावा निर्माण होण्यास मदत होते. म्हणूनच पूर्वी वाळ्याचे पडदे लावले जायचे. ओल्या फडक्याला पर्याय म्हणून वाळ्याचे पडदे अतिशय उपयुक्त आहेत. वाळ्याच्या पडद्यांवर पाणी शिंपडल्यावर त्याला भेदून येणारी हवा घरात अधिक थंडावा निर्माण करते. उन्हामुळे होणाऱ्या दाहावर मात करण्यासाठी हा एक पर्यावरणपूरक पर्याय आहे.

> सुती कापडाचे पडदे

पॉलिस्टर किंवा सॅटिनचे पडदे बदला. त्याऐवजी फिकट रंगाचे सुती कापडाचे पडदे लावा. त्यामुळे घराचे सौंदर्यही खुलून दिसेल. पडद्यांप्रमाणेच सोफा कव्हर, कुशन कव्हर्स, बेडशीटस्चा सेटही सुती असेल याची काळजी घ्या. त्यामुळे घाम येणार नाही.

> लिनन पडदे

घरातील अधिकाधिक नैसर्गिक आणि उबदार वातावरणासाठी लिननचे पडदे अतिशय उपयुक्त आहेत. या प्रकारामध्ये जास्तीत जास्त रंगसंगती उपलब्ध आहे. त्यामुळे आपल्या घराला साजेसे लिननचे पडदे उन्हाळ्यात शिवून घेता येऊ शकतात.

> बांबूंचे पडदे

बांबूच्या अगदी पातळ पट्टय़ांपासून तयार केलेले पडदेही घर, कार्यालयाची शोभा वाढवतात. वाळ्याच्या पडद्यांप्रमाणेच नैसर्गिकतेबरोबरच पारंपरिकताही या पडद्यांमुळे जपली जाते. उन्हाळ्यातही यांचा वापर उपयुक्त ठरतो.

 पडद्यांची निवड करताना

> गडद रंगाचे पडदे उष्णता खेचून घेतात, तर फिकट रंगाचे पडदे उष्णता परावर्तित करतात.

> पडदे विकत घेताना प्रत्येक रंगाच्या शेड्सचा फर्निचर आणि भिंतींच्या रंगसंगतीचा विचार करावा.

> पडदे लावताना खिडकीच्या सहा इंच वर लावा. सीलिंगची उंची अधिक असली तरी ती कमी वाटते.

> गडद रंगांमध्ये सूर्यप्रकाश थेट पडद्यांपर्यंत पोहोचतो आणि अति सूर्यप्रकाशामुळे पडद्याचं कापड खराब होण्याची शक्यता अधिक असते.

> काही जण मोठमोठय़ा डिझाइनचे पडदे लावतात. घर मोठं असेल तरच असे पडदे लावावेत. कारण अशा मोठय़ा डिझाइनमुळे घर लहान दिसायला मदत होते. लहान घर असलेल्यांनी शक्यतो प्लेन किंवा बारीक नक्षीचे पडदे लावावेत.

> फर्निचर निवडतानादेखील तुमच्या पडद्यांना साजेसं असंच फर्निचर निवडा.

> पडदे लावण्याच्या रॉड़मध्ये सिल्व्हर, गोल्डन, कॉपर आणि ब्लॅक असे रंगही मिळतात. त्यामुळे रॉड निवडताना पडद्यांना शोभतील असेच रॉड निवडा.