बाथरूममध्ये लपविल्या देशी दारूच्या 288 क्वार्टर

सामना प्रतिनिधी । हिंगोली

बेकायदेशीररित्या दारू विक्री करणाऱ्यांनी आता नामी शक्कल शोधून काढली असून सेनगाव तालुक्यातील हत्ता नाईक येथे एका व्यक्तीने घराच्या बाथरूममध्ये देशी दारूच्या 288 क्वार्टर लपवून ठेवल्याचा प्रकार पोलिसांनी टाकलेल्या धाडीनंतर उघडकीस आला.

हिंगोलीचे पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांनी अवैध दारूविक्री सह मटका जुगार यासारख्या बेकायदेशीर व्यवसायांवर धाडी टाकण्याचे आदेश जिल्हाभरातील पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत. पोलिसांच्या या धाड सत्रापासून सुटका मिळविण्यासाठी सेनगाव तालुक्यातील हत्ता येथील एका व्यक्तीने चांगलीच नामी शक्कल शोधून काढली. घरातील बाथरूममध्ये देशी दारूच्या 288 क्वार्टरचे सहा बॉक्स लपवून ठेवले होते. सेनगावचे पोलीस निरीक्षक सरदारसिंग ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल भारती व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी हत्ता नाईक येथील दीपक आनंदराव गडदे यांच्या घरावर धाड टाकून बाथरूममध्ये लपवून ठेवलेल्या देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. पोलिसांनी दीपक आनंदराव गडदे याच्याविरुद्ध चोरट्या मार्गाने विक्री करण्यासाठी देशी दारूच्या बाटल्या विनापरवाना बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दीपक गडदे याला नोटीस व समजपत्र देऊन सोडून देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.