पदकविजेते आले इकॉनॉमी क्लासने, तर अधिकारी बिझनेस क्लासने


सामना ऑनलाईन । जकार्ता

रविवारी 18 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा समारोप झाला. या स्पर्धेच्या पदकतालिकेत हिंदुस्थान आठव्या स्थानी राहिला. याउलट अनेक छोटय़ा देशांनी हिंदुस्थानहून सरस कामगिरी केली. मग चर्चा सुरू होते सवा अब्जाहून अधिक लोकसंख्या असलेला हिंदुस्थान क्रीडाक्षेत्रात इतका मागे कसा? स्पर्धा संपल्यानंतर हिंदुस्थानी पदकविजेते खेळाडू इकॉनॉमी क्लासच्या विमानाने परतले, तर खेळाडूंसोबत गेलेले काही अधिकारी बिझनेस क्लासने मायदेशी परतले. अधिकाऱ्यांच्या या लक्झरी वागणुकीवर आपल्या काही खेळाडूंनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली.

आशियाई क्रीडा स्पर्धांत हिंदुस्थानी पथकाचे उप मिशन प्रमुख आर. के. संचेती हे स्पर्धा संपल्यानंतर इंडोनेशियाहून विमानाच्या बिझनेस क्लासने मायदेशी परतले. जकार्ता ते सिंगापूरदरम्यानच्या प्रवासादरम्यान हिंदुस्थानच्या व्हॉलीबॉल संघातील एक खेळाडू म्हणाला, बहुतांश खेळाडू हे इकॉनॉमी क्लासनेच प्रवास करत आहेत आणि आम्हा खेळाडूंची याबद्दल काहीच तक्रार नाही, मात्र स्पर्धेसाठी आलेल्या अधिकाऱयांचे बिझनेस क्लासने प्रवास करणे आम्हाला खटकले आहे. एक खेळाडू म्हणाला, आम्हा खेळाडूंमुळे हे अधिकारी स्पर्धेला आलेत, त्यांच्यामुळे आम्ही नाहीत.

केंद्र सरकारकडून विजेत्यांचा गौरव
केंद्रीय सरकारकडून आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्यांचा मंगळवारी गौरव करण्यात आला. यावेळी सुवर्ण पदक विजेत्यांना 40 लाखांचे, रौप्य पदक विजेत्यांना 20 लाखांचे आणि कास्य पदक विजेत्यांना दहा लाखांचे बक्षीस प्रदान करण्यात आले.

‘मी इकॉनॉमी क्लासनेच विमान प्रवास करणार होतो, मात्र मी माझ्या एअर माइल्सचा वापर करून बिझनेस क्लासचे तिकीट बुक केले. एअर माइल्स वापरून तिकीट अपग्रेड करून घेतले. नाहीतर मीही इकॉनॉमी क्लासनेच प्रवास केला असता.’
– आर. के. संचेती (अधिकारी, हिंदुस्थान बॉक्सिंग महासंघ)