थंडीचे भाकित


नमिता वारणकर,[email protected]

थंडी कधी वाढते… कधी कमी होते… दिवसागणिक बदलणारे हे ऋतूचक्र आपले हवामान खाते व त्याचा अंदाज हा नेहमी मस्करीचा विषय ठरतो. पण कसे चालते ऋतुचक्राच्या या अंदाजमापनाचे कार्य?

थंडी… कधी गुलाबी… कधी बोचरी, गारठवणारी… मन प्रसन्न करणारी… पहाटे दुलईत साखरझोपेचा आस्वाद घ्यायला लावणारी… मस्त लोकरीचे कपडे करून शेकोटीच्या ऊबेचं महत्त्व सांगणारी… चहाची, चमचमीत, मसालेदार पदार्थांची आठवण… फिरायला प्रोत्साहन देणारी… मनाला प्रसन्नता देणाऱया सुखकर, आरोग्यदायी थंडीचे ‘अनेक प्रकार’… कधी ती कमी-जास्तही असते. निसर्गाचं हे चक्र आणि त्यावर चालणारं हवामान विभागाचं काम कसं असतं?

राज्यभरात थंडी वाढल्याचे अंदाज कधी वर्तवले जातात, याविषयी ज्येष्ठ हवामानतज्ञ डॉ. रामचंद्र साबळे सांगतात, हवेचा दाब आणि तापमान यांच्या परस्पर संबंधावर थंडी अवलंबून आहे. सूर्य आता मकरवृत्तावर आहे. जसजसा सूर्य मकरवृत्ताकडे वळू लागतो तसतशी थंडी वाढत जाते. याचे पडसाद राज्यभरात सर्वच ठिकाणी जाणवू लागतात. थंडी वाढण्याची शक्यता डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात आणि जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात जास्त जाणवते. तसेच जानेवारीच्या दुसऱया आठवडय़ापासून थंडी कमी व्हायला सुरुवात होते. हे कशामुळे घडतं? तर या दिवसात मकरसंक्रांतीनंतर सूर्याचं उत्तरायण सुरू होतं. यावेळी सूर्यकिरणांची लांबीही कमी होत जाते. त्यामुळे तापमान वाढतं. पृथ्वीच्या सूर्याभोवती असलेल्या भ्रमणानुसार हे बदल होत असतात.

मुंबईत बहुतांश वेळा थंडी कमी असते तर कधी जास्त का असते, याविषयी साबळे म्हणाले की, मुख्यतः मुंबई, ठाणे, कोकण समुद्रकिनारी भागात 10 अंश डिग्री सेल्सियसच्या खाली किमान तापमान जातच नाही. त्यामुळे या हंगामात पिकं घेतली जातात. कोकण किनारपट्टीकडे येणाऱया खाऱया वाऱयांचा फायदा आंबा फळासाठी चांगला होता. हे आपल्याला निसर्गाकडून वरदान लाभलं आहे.

वाऱयाची दिशा आणि थंडी

सूर्य मकरवृत्तावर असतो त्या ठिकाणचं तापमान जास्त असतं. तिथला हवेचा दाब कमी असतो. हिमालय आणि हिमालयाच्या पायथ्याशी हवेचा दाब जास्त असतो, तर महाराष्ट्रात कमी असतो. याप्रमाणे हवा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहते. वाऱयाची दिशा उत्तरेकडून दक्षिणेकडे, इशान्येकडून दक्षिणेकडे, वायव्येकडून दक्षिणेकडे असते. हे वारे फारच थंड असून ते ज्या प्रदेशातून वाहतात त्यावेळी थंड हवा घेऊन येतात. उदा. निफाड, नाशिक, नगर अशी ठिकाणे. ही नैसर्गिक क्रिया आहे. हल्ली हवेच्या प्रदूषणामुळे हे प्रमाण असंतुलित झालंय, अशी माहिती ते देतात.

‘थंडी’ आणि हवामान खात्याचं काम...

हवामान खात्याच्या 6 हजार वेधशाळा आहेत. प्रत्येक वेधशाळेत किमान तापमानाची नोंद सकाळी 7.20 वाजता केली जाते. कमाल तापमान दुपारी 2.30 वाजता नोंदवलं जातं. ही नोंद एकाच वेळी सर्व ठिकाणच्या वेधशाळांमध्ये केली जाते. त्याचं रेकॉर्डिंग होतं. ते प्रत्येक वेधशाळेत स्टोअर केलं जातं. त्यावर भाकितं केली जातात.

आर्द्रता कशी मोजतात?

हवेतली आर्द्रता ही ड्राय बल्ब आणि वेट बल्बद्वारे मोजली जाते. एक बल्ब कोरडा असतो आणि दुसऱया बल्बला ओलं कापड गुंडाळलेलं असतं. त्याखाली बाटली ठेवलेली असते. त्यामध्ये पाणी असतं. या दोन्हीमधील बदलांवरून त्याची आर्द्रता तपासली जाते. हे बदल सतत होत असतात. उन्हाळ्यात आर्द्रता कमी, तर पावसाळ्यात जास्त असते. काही ठराविक ढग असे असतात, जे एक ते दीड किलोमीटर उंचीपर्यंत आहेत तेच पाऊस देतात. त्या ढगांमध्ये असलेल्या आर्द्रतेवर पावसाचं प्रमाण अवलंबून असतं. आर्द्रता पुरवणारे वारे ज्या भागात जास्त तिथे पाऊस जास्त पडतो.