थंडीची तयारी

>> पूजा तावरे, फॅशन डिझायनर  

ऑक्टोबर हीट संपल्यानंतर धुक्यासह येणार्‍या गुलाबी थंडीमध्ये स्टायलीश दिसण्यासाठी महिला नवनवीन फॅशनला पसंती देताना पाहायला मिळत आहेत. विंटर आऊटफिटस म्हटलं की, उबदार, आरामदायी आणि तितकेच फॅन्सी पण असायले हवेत. त्याकरिता बाजारपेठेत वूलनची विविध प्रकारातील आऊटफिटस देखील उपलब्ध झाली आहेत. शालीपासून ते सिल्क व वूलन मिक्समधून तयार केलेले स्वेटर्स, जॅकेटस, कॅप अशा युनिक अशा विंटरवेअर्सना पसंती पाहायला मिळते. लोकरीचे स्वेटर, शाल यापेक्षा सध्या जॅकेटस्, श्रग, डेनिम यांना प्राधान्य मिळत आहे.

रंग थंडीचे

थंडी म्हटलं की,सगळं कसं कलरफुल आणि प्लेझंट. हिवाळी फॅशन म्हटलं की समोर येतात ब्राइट आणि बोल्ड कलर्स. या मौसमात तरूणींना ब्ल्यू, यलो, ऑरेंज आणि ग्रीन अशा रंगांचे खास आकर्षण असते.त्यामुळे या रंगांतील विविध शेडस असणारे कपडे, शर्टस, कुर्ते, जॅकेट वापरू शकता. तसेच या रंगांत कॉन्ट्रास्ट म्हणून ब्लॅक आणि व्हाईटचा वापर करून ऍक्सेसरी वापरू शकता.

 

युनिक स्कार्फस

थंडीपासून आणि थंडीत दिवसा पडणार्‍या प्रखर उन्हापासून बचाव करण्यासाठी व स्टायलिश दिसण्यासाठी देखील स्कार्फला पसंती मिळत आहे. शिफॉन स्कार्फ हे सर्व सीजनमध्ये वापरू शकता. स्कार्फ शिफॉनचे बनवत असल्यामुळे ते दिसायला व त्याचा टच मुलायम असतो. याची खासियत म्हणजे यात वापरलेले कलर्स हे शायनींग करतात. सध्या पॉकेट स्कार्फची फॅशन इन आहे. या स्कार्फमध्ये पॉकेट दिले जाते ज्यामध्ये तुम्हाला कोणतीही वस्तू कॅरी करता येते. तसेच डिफरंट लूकसाठी विंटर फ्लोरल स्कार्फ वापरू शकता.

 

जॅकेट्स

थंडीत जॅकेट आजकाल प्रत्येकीला हवचं असतं. सध्या सुटय़ांच्या सीझनमध्ये कुठल्याही थंड हवेच्या ठिकाणी जाताना जॅकेट्स स्टायलिश लुक देतील. या जॅकेटमध्ये लाँग आणि शॉर्ट असे दोन प्रकार येतात.त्यातही डेनिम आणि लेदर जॅकेटसना थंडीत मागणी पाहायला मिळते. लेदर जॅकेटमध्ये खास रंगसंगती व डिझाईन्स आहेत.

ऑनिमल प्रिंट

हिवाळ्यामध्ये ऑनिमल प्रिंट फॅशनला तरुणींकडून अधिक पसंती दिसून येत आहे. यामध्ये वाघ, साप, चित्ता या प्राण्यांच्या डिझाईनच्या कपडय़ांना अधिक मागणी दिसून येत आहे. ऑनिमल प्रिंटमध्ये केवळ कपडेच नव्हे तर विविध ऍक्सेसरीजही उपलब्ध आहेत. त्यामुळे या फॅशनची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे.

लेदर ड्रेसेस व लाँग कोट

हिवाळ्यापासून सरंक्षणासाठी लेदर ड्रेस अथवा जॅकेट्स उत्तम पर्याय आहे. लेदरमधील कोणतीही गोष्ट प्रत्येकाला आवडतच असते. त्यामुळे लेदर जॅकेटही प्रत्येकाला तेवढंच प्रिय आहे. यंदाच्या हिवाळी ऋतूमध्ये विविध शेड्स आणि डिझाइन्स असलेल्या लेदर जॅकेटला पसंती मिळत आहे. लेदर जॅकेट्स बरोबर लाँग कोटची फॅशन देखील तरूणाईच्या पसंतीस पडत आहे.

 

युनिक क्लोथस

नेहमीचे स्वेटर्स, जॅकेटस, स्कार्फस वापरण्याचा कंटाळा आला असेल तर काहीतरी युनिक आणि हटके नक्कीच या थंडीत ट्राय करा. त्यामध्ये स्ट्रिप्ड स्वेटर्स आणि अँकल लेंथ ट्राऊजर्स वापरू शकता. त्यावर स्कार्फस कार्डिगन्स वापरल्यास खूप आकर्षक दिसू शकतात. शिवाय सध्या सलवार कमिज वर वापरण्यासाठी राजस्थानी डिझाईन असलेले कलरफुल हाफ जॅकेट उपलब्ध आहेत. स्लीव्हलेसपासून ते फुल स्लीव्हजपर्यंतचे कुर्ते छानच.