अजीम प्रेमजी बनले आशियातील सर्वात दानशूर व्य़क्ती; 1.45 लाख कोटींची संपत्ती दान

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

विप्रोचे सर्वेसर्वा अजीम प्रेमजी यांनी त्यांची एक लाख 45 हजार कोटींची संपत्ती दान करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी प्रेमजी यांनी याबाबतची घोषणा केली. या निर्णयामुळे 73 वर्षांचे प्रेमजी आशियातील सर्वात दानशूर व्यक्ती बनले आहेत. तसेच जगातील सर्वश्रेष्ठ पाच दानशूर व्यक्तींमध्येही त्यांचा समावेश झाला आहे.ते आता जागतिक दर्जाचे मानवतावादी समाजसेवक बिल गेट्स, वॉरन बफेट यांच्या पंक्तीत जाऊन बसले आहेत.

माहिती प्रसारण (आयटी) क्षेत्रातील उद्योजक आणि समाजसेवक अजीम प्रेमजी यांनी या निर्णयामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. समाजासाठी असलेली आपली बांधीलकी त्यांनी या निर्णयातून पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. आपल्या कंपनीतील अतिरिक्त 34 टक्के समभाग दान करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे. अजीम प्रेमजी फाऊंडेशनतर्फे त्यांनी आतापर्यंत 1 लाख 45 हजार कोटींची संपत्ती समाज कार्यासाठी दान केली आहे. या निर्णयामुळे ते आशियातील सर्वात दानशूर व्यक्ती बनले आहेत. तसेच जगभरातील सर्वश्रेष्ठ दानशूर बिल गेट्स, वॉरन बफेट, जॉर्ज सोरोस या पाच व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश झाला आहे.

कंपनीच्या शेअर म्हणजे समभागातील 34 टक्के रक्कम ते समाज कार्यासाठी देणार आहेत. त्यानुसार 52 हजार 750 कोटी रुपयांची रक्कम अजीम प्रेमजी फाऊंडेशनला देण्यात येणार आहे. आतापर्यंत प्रेमजी यांनी दान केलेल्या रकमेचा आकडा 1 लाख 45 हजार कोटी झाला आहे. प्रेमजी यांनी या निर्णयाने समाजासमोर नवा आदर्श ठेवला आहे. त्यामुळे आणखी काही दानशूर समाजकार्यासाठी पुढे येतील अशी अपेक्षा रोहिणी नीलकेणी यांनी व्यक्त केली. असा निर्णय घेण्यासाठी मोठे मन, हृदय आणि दूरदृष्टी असावी लागते, असेही त्या म्हणाल्या. त्यांच्या या निर्णयाने समाजातील जटील समस्या सुटतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नंदन आणि रोहिणी नीलकेणी यांनी त्यांच्या संपत्तीतील अर्धी रक्कम दान करण्याचा निर्णय याआधीच घेतला आहे.

समाजातील दानशूर व्यक्ती कमी होत असताना प्रेमजी यांनी घेतलेला निर्णय महत्त्वाचा आहे. हिंदुस्थानातील 2014 नंतर दानशूर व्यक्तींची संख्या कमी झाल्याचे बेन एन्ड कंपनीने एका अहवालात नमूद केले आहे. बंगळुरूतील मोगुल कंपनीवगळता 10 कोटी किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम दान करणाऱ्यांची संख्या 4 टक्क्यांनी घटल्याचे अहवालात म्हटले आहे. अजीम प्रेमजी यांचा हा निर्णय आणि दान करण्याची प्रवृत्ती जमशेदजी टाटा आणि डोराबजी टाटा यांच्याशी मिळतीजुळती असल्याचे बेन कॅपिटलचे व्यवस्थापकीय संचालक अमित चंद्रा यांनी सांगितले. प्रेमजी फाऊंडेशनकडून बंगळुरूत अजीम प्रेमजी विद्यापीठ चालवण्यात येते. या विद्यापीठाची क्षमता वाढवून 5 हजार विद्यार्थी आणि 400 शिक्षक असतील अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच उत्तर हिंदुस्थानातही एक विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. देशातील शिक्षणाचा दर्जा वाढवण्याचा फाऊंडेशनचा उद्देश आहे. हे फाऊंडेशन कर्नाटक, उत्तराखंड, राजस्थान, छत्तीसगड, पद्दुचेरी, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि ईशान्य हिंदुस्थानात समाजसेवी कार्य करते.