घरमालकावर बलात्काराचा खोटा आरोप लावण्यासाठी पत्नीवर जीवघेणा हल्ला

सामना ऑनलाईन । राजकोट

संशयापोटी पत्नीवर चाकूने हल्ला करून तिला घरमालकावर सामूहिक बलात्काराचा आरोप करण्याबद्दल दबाव आणल्याची घटना गुजरातमधील राजकोट येथे घडली आहे. संतोक राणा असं या जखमी महिलेचं नाव असून प्रकाश राणा असं तिच्या आरोपी नवऱ्याचं नाव आहे.

एका हिंदी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, बुधवारी सकाळी संतोक हिला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे पोलिसांनी केलेल्या चौकशीत तिने आपल्या घरमालकाने दोन साथीदारांसह सामूहिक बलात्कार आणि चाकूने हल्ला केल्याचा जबाब नोंदवला होता. मात्र, पोलिसांनी केलेल्या अधिकच्या चौकशीत महिलेने खरी घटना सांगून टाकली.

तिच्या म्हणण्यानुसार, तिचा नवरा प्रकाश हा तिच्यावर नेहमी संशय घेत असे. मंगळवारीही त्याने संशय घेऊन तिच्यावर चाकूने हल्ला केला. मात्र, नंतर भीतीपोटी त्याने संतोकला धमकावलं आणि घरमालकासह अन्य दोघांवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव आणला. त्यामुळे तिने घाबरून पोलिसांना खोटं सांगितलं. पोलिसांनी तिच्या जबाबानुसार तिचा पती प्रकाश राणा याच्या विरोधात तक्रार नोंदवली असून पुढील तपास सुरू आहे.