‘बॅग’वतीसाठी महिला एक्सरे स्कॅनरमध्ये घुसली, घटनेचा व्हिडीओ व्हायरल

सामना ऑनलाईन । शांघाई

महिला आपल्या फॅशन सेन्सबद्दल फार जागरूक असल्याचे आपण नेहमीच ऐकतो. तसेच त्या आपल्या प्रत्येक गोष्टीची काळजीही आपुलकीने घेत असल्याचे दिसून येते. परंतु या काळजीपोटी दक्षिण चीनमध्ये राहणाऱ्या एका महिलेने एक असा आचरटपणा केला ज्यामुळे ही महिला जगभरातील सोशल मिडीयावर चर्चेचा विषय बनली आहे. चीनमधील एका रेल्वे स्टेशनवर एक महिला रविवारी आपल्या पर्स सोबतच सुरक्षा तपासणीसाठी लावलेल्या एक्स-रे स्कॅनरमध्ये घुसली. या घटनेचा व्हिडीओ चीनच्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरलमध्ये झालेल्या व्हिडीओमध्ये एक महिला एक्स-रे स्कॅनरमधून बाहेर येत असून त्याचदरम्यान मशीनच्या बाजूला आपआपल्या सामानाची वाट पाहत असलेली माणसे त्या महिलेचा हा प्रकार पाहून थक्क होऊन जातात. या व्हिडीओला आतापर्यंत ५५ हजार लोकांनी पाहिला आहे. महिलेला भीती वाटत होती की, तिच्या पर्समध्ये ठेवलेले पैसे हरवू शकतात म्हणून तिने हा प्रकार केल्याचे समजते आहे.

या प्रकारानंतर महिला इंटरनेटवर ट्रोल झाली असून तिला नेटकऱ्यांनी ‘विचित्र’ म्हणत तिची खिल्ली उडवली आहे. तसेच या मशीनमध्ये वापरण्यात येणारी किरणे ही शरिरासाठी घातक असतात त्यामुळे काहींनी तिला स्वतःच्या जीवापेक्षा पैसे महत्त्वाचे आहेत असे म्हणत राग व्यक्त केला आहे.