गुजरातच्या उपमुख्यमंत्र्यांवर महिलेने बांगड्या फेकल्या

सामना ऑनलाईन । सुरत

गुजरातचे उपमुख्यमंत्री नितिन पटेल यांच्यावर भर कार्यक्रमात एका महिलेने बांगड्या फेकल्या आहेत. महिलेने पटेल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत बांगड्या फेकल्या. त्यामुळे कार्यक्रमात थोड्या वेळासाठी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. एएनआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.

नितिन पटेल वलसाड जिल्हापरिषदेच्या एका कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. त्यावेळी महिलेने त्यांच्यावर बांगड्या भिरकावल्या. पोलिसांनी महिलेला तात्काळ ताब्यात घेतले, मात्र पोलिसांनी पकडल्यानंतरही महिला गुजराती भाषेत ‘पटेल भ्रष्टाचारी आहे, वलसाडमध्ये त्यांनी भ्रष्टाचाराचे दुकान उघडले आहे’, असे मोठमोठ्याने ओरडत होती.

नितिन पटेल हे पटेल-पाटीदार समाजाचे मोठे नेते आहेत. गेल्या ३० वर्षांपासून ते भाजपामध्ये कार्यरत आहेत. गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदी बेन पटेल यांनी राजीनामा दिल्यानंतर नितिन पटेल यांचे नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर होते, मात्र ऐन वेळी विजय रुपानी यांनी मुख्यमंत्री बनवण्यात आले.