मोबाईल चोरामुळे तिने हात-पाय गमावला!

सामना प्रतिनिधी । मुंबई

धावत्या लोकलच्या दरवाजात उभी राहून मोबाईलवर बोलणे कल्याणच्या द्रविता सिंग हिला महागात पडले. सिग्नलच्या पोलमागे लपलेल्या एकाने तिच्या डोक्यात बांबूचा जोरदार फटका मारला तेव्हा ती तरुणी लोकलमधून खाली कोसळली. दुर्दैवाने बाजूच्या ट्रकवरून येणाऱया भरधाव लोकलने तिला धडक दिली. या दुर्घटनेत तिला आपला एक हात आणि पाय गमवावा लागला. मस्जिद बंदर आणि सॅण्डहर्स्ट रोड स्थानकांदरम्यान बुधवारी ही घटना घडली. पोलिसांनी त्या अल्पवयीन मोबाईल चोराला अटक केली आहे.

कल्याणमध्ये राहणारी द्रविता सिंग (२३) ही तरुणी नेहमीप्रमाणे कामानिमित्त बुधवारी सकाळी लोकलने सीएसएमटीच्या दिशेने जात होती. सॅण्डहर्स्ट रोड स्थानक सोडताच तिला फोन आला. त्यामुळे मोबाईलवर बोलण्यासाठी ती लोकलच्या दरवाजावर गेली. ती फोनवर बोलत असतानाच अचानक तिच्या डोक्यावर बांबूचा जोरदार फटका बसला. त्यामुळे द्रविता लोकलमधून खाली पडली. ती ट्रॅकमध्ये पडताच आरोपीने तिचा मोबाईल हिसकावून पळ काढला. दरम्यान, द्रविता ट्रकमध्ये पडलेली असताना दुसऱया लोकलने तिला धडक दिली. यात ती गंभीर जखमी झाली. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच सीएसएमटी पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू करून खबऱयांचे जाळे पसरवले. गुरूवारी तो आरोपी सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाबाहेर येणार असल्याची खबर मिळताच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.