आई बाळाला विमानतळावर विसरली, पायलटने विमान मागे वळवले

सामना ऑनलाईन, जेद्दाह

प्रवासात घाईगडबडीत बॅग किंवा जवळची वस्तू विसरण्याचा प्रकार काही नवीन नाही. असे आपल्याबाबतही अनेकदा घडते. मात्र विमानातून परदेशात निघालेली एक महिला चक्क आपल्या मुलालाच विमानतळावर विसरून गेल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. मुलाला विसरून आल्याचे लक्षात आल्यावर त्या महिलेने विमानातच रडून गोंधळ घातला. अखेरीस पायलटने प्रसंगावधान राखत विमान मागे वळवण्याची परकानगी मिळवली आणि या मायलेकराची पुन्हा भेट घडवून आणली.

फ्लाईट एसव्ही 832 हे विमान जेद्दाह येथून क्वालालंपूरसाठी रकाना झाले होते. विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच एका महिलेने आपले मूल विमानतळावरच राहिल्याचे सांगून रडारड करण्यास सुरुवात केली. हा प्रकार कळल्यानंतर पायलटने तातडीने नियंत्रण कक्षाशी (एटीसी) संपर्क साधला. एटीसीमधील कर्मचाऱ्याने पायलटकडून  विमानात नेमके काय झालंय त्याची माहिती घेतली. एक महिला आपल्या मुलाला किंग अब्दुल अझीझ इंटरनॅशनल विमानतळावर विसरून आली आहे आणि ती पुढील प्रवास करण्यास नकार देत आहे अशी माहिती पायलटने एटीसीमधील कर्मचाऱ्याला दिली. यासंदर्भातील व्हिडीओही व्हायरल झाला आहे. त्यानंतर एटीसीने सदर वैमानिकास किमान माघारी वळवून पुन्हा उतरण्याची परवानगी दिली. दरम्यान, वैमानिकाने मानकीय दृष्टिकोनातून दाखवलेल्या प्रसंगावधानाचे सोशल मीडियामधून कौतुक होत आहे. मात्र आपल्या मुलाला विसरून गेलेल्या बेफिकीर महिलेकर टीका होत आहे.