नायजेरियन नवऱ्याच्या त्रासातून सुटण्यासाठी तिने रचला अपहरणाचा बनाव ?

सामना ऑनलाईन, मुंबई

पुण्यातून मुंबईला मुलीसोबत आलेल्या एका २८ वर्षांच्या महिलेचं अपहरण झाल्याने मुंबई पोलीस अलर्ट झाले होते. पोलिसांनी या महिलेला आणि तिच्या मुलीला दोघींना शोधून काढत त्यांची सुटका केली आहे. या दोघींचे अपहरण झालं असून आपल्याला एक कोटींच्या खंडणीचा कॉल आला होता अशी तक्रार या महिलेच्या नायजेरियन नवऱअयाने पुण्यामध्ये केली होती. पोलिसांनी या महिलेची सुटका केल्यानंतर ज्या गोष्टी तपासात पुढे आल्या आहेत, त्या ऐकून पोलीस चक्रावून गेले आहेत.

१५ डिसेंबरला ही महिला मुंबईमध्ये एका जाहिरातीसाठी मुलीच्या ऑडीशनसाठी आली होती, १७ तारखेला पेशाने जिम ट्रेनर असलेल्या तिच्या नायजेरियन नवऱ्याला अनोळखी कॉल आला. बायको आणि मुलगी सुखरूप परत हवी असेल तर १ कोटींची खंडणी दे असं कॉल करणाऱ्याने सांगितलं. यानंतर या नवऱ्याने येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. १८ डिसेंबरला मुंबई पोलिसांनी नालासोपाऱ्याहून अर्जुन राणावत नावाच्या एका इव्हेंट मॅनेजरला अटक केली. हा या महिलेचा प्रियकर असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.

नायजेरियन नवरा आणि या महिलेचा काही वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता, १० वर्षांपूर्वी बायकोसोबत हा नायजेरियन माणूस पुण्यात स्थायिक झाला होता. मात्र या महिलेचे राणावतसोबत प्रेमसंबंध जुळले.  दोघांनी मिळून महिलेच्या अपहरणाचा आणि खंडणीचा कट रचला मात्र पुण्याहून निघण्यापूर्वी आणि नंतर या महिलेचे आणि राणावतचे साततत्याने मोबाईलवरून होत असलेले संभाषण पोलिसांना संशयास्पद वाटले होते. संशयाच्या आधारावर पोलिसांनी राणावतला ताब्यात घेतल्यानंतर त्याने या सगळ्या कटाचा उलगडा केला.

हे प्रकरण इथेच संपलं असं पोलिसांना वाटत होतं मात्र या महिलेच्या वडीलांनी दिलेल्या माहितीमुळे प्रकरण आणखी गुंतागुंतीचं बनलं आहे. ही महिला नवरा शारिरीक आणि मानसिक त्रास देत असल्याने मुंबईतील तिच्या एका मैत्रिणीकडे राहात होती असं तिच्या वडीलांनी सांगितलं आहे. तिचा ठावठिकाणा शोधून काढण्यासाठी तिच्या नायजेरियन नवऱ्याने पोलिसांचा वापर केला असावा असं तिच्या वडीलांना वाटत आहे. पोलीस जेव्हा या महिलेची सखोल चौकशी करतील तेव्हाच या प्रकरणाचा पूर्ण उलगडा होईल.