बायका नवऱ्यापासून लपवतात ‘या’ गोष्टी


सामना ऑनलाईन । मुंबई

नवरा बायकोच्या नात्यात विश्वास हा एक महत्त्वाचा दुवा असतो. लग्नगाठ बांधली जात असताना नवरा आणि बायको एकमेकांसोबत प्रामाणिक राहण्याचे वचन देत असतात. नवरा बायकोचे नाते कितीही विश्वासाचे, प्रेमाचे असले तरीदेखील बायका काही गोष्टी त्यांच्या नवऱ्यापासून लपवून ठेवतात.

घरखर्चातून बाजूला काढलेले पैसे
घरखर्चातून पैसे बाजूला काढण्याची सवय ही प्रत्येक महिलेला असते. मात्र या पैशांविषयी त्या कधीच नवऱ्याला सांगत नाही. अनेक बायका घर खर्चातून वाचवून बाजूला ठेवलेल्या पैशांसाठी वेगळं पाकिटच ठेवतात. हे पाकिट कुणाच्याही हाती लागणार नाही याची खबरदारी देखील त्या घेतात. मात्र जेव्हा घरात पैशांची गरज असेल, मुलांच्या शिक्षणासाठी पैसे कमी पडत असतील तेव्हा मात्र त्यांचा हा खजिना बाहेर पडतो.

मुलांनी केलेल्या चुका
बायका या मुलांच्या बाबतीत फार हळव्या असतात. त्यामुळे मुलांनी केलेल्या चुका, त्यांची मस्ती, शाळेतनं आलेल्या तक्रारी शक्यतो त्या नवऱ्यांजवळ बोलून दाखवत नाही. जर तसे केले तर मुलांना वडिलांच्या हातचा मार खावा लागेल. तसे होऊ द्यायचे नसल्याने बहुतांश आया या त्यांच्या मुलांच्या चुका गुपितच ठेवतात.

शॉपिंग
हल्लीच्या या ऑनलाईनच्या जमान्यात अनेक महिला सर्रास ऑनलाईन खरेदी करत असतात. मात्र अनेक महिला या ऑनलाईन खरेदी विषयी त्यांच्या नवऱ्यांना सांगत नाहीत.

तब्येतीविषयी
बऱ्याचदा बायका या त्यांच्या घर संसारात एवढ्या व्यस्त होतात की त्यांच्या तब्येतीकडेही दुर्लक्ष करतात. नवरा दिवसभराच्या काम व प्रवासाने दमलेला असतो. जर अशावेळी आपल्याला होणारा त्रास जर नवऱ्याकडे बोलून दाखवला तर नवऱ्याला अधिक त्रास होईल या विचाराने अनेक महिला त्यांचा त्रास नवऱ्याला सांगत नाहीत