पती-पत्नी आणि ‘तो’?… उशीने तोंड दाबून पत्नीने केली पतीची हत्या

सामना ऑनलाईन । हैदराबाद

तेलंगणाच्या नालगोंडा जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पत्नीने पतीची उशीच्या साहाय्याने तोंड दाबून हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. भारती असं या महिलेचं नाव असून पोलिसांनी तिला याप्रकरणाची अधिक चौकशी करण्यासाठी ताब्यात घेतलं आहे. विवाहबाह्य संबंधातून ही हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमा नाईक असं मृत व्यक्तीचं नाव आहे. सोमाच्या पत्नीने तो झोपलेला असताना उशीच्या साहाय्याने त्याचे तोंड दाबले. त्यामध्ये गुदमरून त्याच्या मृत्यू झाला आहे. पत्नी उशिरापर्यंत बाहेर असल्याने तसेच खूप वेळ फोनवर बोलत असल्यामुळे सोमा भारतीवर विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय घेत असे. त्यामुळे या पती-पत्नीमध्ये सारखे वाद होत असत. या दोघांना एक लहान मुलगादेखील आहे.

सोमाला दारूचे व्यसन होते. तो रात्री दारू पिऊन घरी आल्यावर पती पत्नीमध्ये नेहमीच भांडण होत होती. एक दिवस अचानक रात्री भारतीने तिचा पती मृत झाला म्हणून आरडाओरडा करायला सुरुवात केली. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी सोमाला रूग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. सोमाच्या भावाने त्याच्या मानेवर काही निशाण असल्याने हत्येचा संशय व्यक्त केला आहे. तसेच शेजाऱ्यांनीही यांच्यात रोजच वाद होत असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. त्यामुळे पोलीस हा संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.