घरच्यांना कंटाळली अन् स्वत:शीस लग्न गाठ बांधली

3

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण असतो. लग्नानंतर काय करायचे आणि काय नको याचे प्लॅनिंग आधीपासूनच सुरू झालेले असतात. अशातच वयात आलेल्या मुला-मुलींमागे पालकांचा लग्न कर… लग्न कर… असा रट्टा लागलेला असतो. अनेकदा पालकांच्या हट्टापाई मुलांना लग्नबंधनात अडकावे लागते. आता तुम्ही विचार करत असाल की हे सर्व फक्त आपल्याकडेच घडते की काय. तर नाही, विदेशातही हाच प्रकार पाहायला मिळतो. पालकांच्या तगाद्याला कंटाळून एका तरुणीने स्वत:शीच लग्न उरकून घेतले आणि घरच्यांवर सूड उगवला.

यूगांडा या देशामध्ये एका तरुणीने घरच्यांच्या ‘लग्न कर’ या तगाद्याला कंटाळून स्वत:शीच सात फेरे घेतले. या तरुणीचे नाव लूलू जेमिया असून ती 32 वर्षाची आहे. लूलू ऑक्सफर्ड विद्यापिठाची विद्यार्थीनी आहे. तिने 27 ऑगस्टला स्वत:शी लग्न केले. या लग्न सोहळ्यात तिने पांढऱ्या रंगाचा गाऊन घातला होता आणि प्रथा-परंपरेनुसार सर्व विधी करण्यात आले. तसेच लग्नाला उपस्थित असणाऱ्या पाहुणे मंडळींनी तिने अशा लग्नामागील संकल्पनाही सांगितली. परंतु तिच्या या लग्नाला आई-व़डील मात्र उपस्थित नव्हते.

दरम्यान, या अनोख्या लग्नाबाबत मी जेव्हा आईला सांगितले तेव्ही ती काही वेळ गोंधळात पडली. परंतु मी तिला सर्व समजावून सांगितले. तसेच सर्व प्रथा-परंपरांचे पालन करून लग्न केल्याचे सांगितले, असे डेली मेलशी बोलताना लूलूने म्हटले. आपल्या या आगळ्यावेगळ्या लग्नाचे समर्थनही लूलूने एक ब्लॉग लिहून केले आहे.

यात तिने म्हटले की, मी सोळा वर्षाची झाली तेव्हा वडिलांनी माझ्या लग्नसोहळ्यासाठी भाषण लिहिले. तसेच प्रत्येक वाढदिवसाला आई, मुलीला चांगला नवरा मिळू दे अशी देवाकडे प्रार्थना करायची. आई-वडिलांची काळजी संपवण्यासाठी मी लग्नाचा निर्णय घेतला आणि माझ्या 32 व्या वाढदिवशी माझी काळजी घेऊ शकणाऱ्या व्यक्तीशी विवाह केला. तसेच या निर्णयाशी आपण ठाण असणार असल्याचेही ती म्हणाली.