उत्तर प्रदेशात नवऱ्याच्या उपचारासाठी १५ दिवसाच्या बाळाला विकले

सामना ऑनलाईन । बरेली

उत्तरप्रदेशमधील बरेली येथे एका महिलेला तिच्या पतीवर उपचार करण्यासाठी स्वत:च्या १५ दिवसांच्या बाळाला विकावे लागले आहे. या महिलेने तिच्या बाळाल पंचेचाळीस हजारात विकले आहे.

गेल्या महिन्यात या महिलेचा पती बांधकामाच्या ठिकाणी काम करत होता. तिथे त्याला एक अपघात झाला होता. त्या अपघातात त्याच्या पाठिच्या कण्याला इजा झाली होती. त्यामुळे तो चालू व बसू शकत नव्हता. स्थानिक डॉक्टरांनी त्याला लखनौला जाऊन उपचार घेण्यास सांगितले होते. त्यावेळी त्याची बायको नऊ महिन्यांची गरोदर होती. पंधरा दिवसांपूर्वी त्याच्या बायकोची प्रसूती झाली व त्यांना दुसरा देखील मुलगा झाला.

पतीच्या उपचारांसाठी त्यांच्याकडे पैसे नसल्याने या महिलेने गावकऱ्यांना मदत करण्याची विनंती केली होती. पण कुणीचा त्यांना मदत केली नाही. त्यामुळे तिने नुकत्याच जन्मलेल्या बाळाला विकण्याचे ठरविले. बरीच शोधाशोध केल्यानंतर एका जोडप्याने त्यांचे बाळ ४५ हजार रूपयांना विकत घेतले. लवकरच हि महिला नवऱ्याला उपचारासाठी लखनौला घेऊन जाणार आहे.