महिलेच्या धाडसामुळे वाचला तरूणाचा जीव

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

मुंबई – नांदेड तपोवन एक्स्प्रेसने दरवाजामध्ये बसून प्रवास करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाचा तोल गेल्यामुळे तो धावत्या रेल्वेतून खाली कोसळला. त्या तरुणाला वाचविण्यासाठी त्या डब्यातील महिला जिवाच्या आकांताने ओरडली आणि साखळी ओढून रेल्वे थांबवून परत पाठीमागे घेण्यास रेल्वे गार्डला भाग पाडले. प्रवासी महिलेच्या धाडसामुळेच जखमी तरुणाला योग्यवेळी उपचार मिळाले.

मुंबई – नांदेड तपोवन एक्स्प्रेसने ठाणे येथून बसलेला २० वर्षीय तरूण दीपक बालासिंग मनावत हा दरवाजात बसून प्रवास करत होता. लासूर – रोटेगावदरम्यान असलेल्या करंजगाव रेल्वे स्टेशनच्या काही अंतरावर त्याचा तोल जाऊन खाली कोसळला. प्रवासी पडताना पाहून महिला प्रवासी जोरात ओरडली. मात्र रेल्वे वेगात पुढे जाऊ लागल्यामुळे महिलेने तातडीने रेल्वे थांबविण्यासाठी साखळी ओढली. साखळी ओढल्यामुळे रेल्वे लांब पल्ल्यावर जाऊन थांबली. महिला प्रवाशाने खाली उतरून तपोवन एक्स्प्रेसच्या गार्डला ‘प्रवासी खाली पडला आहे, गाडी मागे घ्या’, अशी विनंती केली. त्यावेळी गार्ड आणि आरपीएफच्या जवानाने ‘प्रवासी पडलाच नाही’, असे म्हणत महिलेवर ओरडल्यामुळे संतप्त झालेल्या महिलेने गार्डला आणि ‘आरपीएफ’ला गाडी पाठीमागे घेता की नाही? असे म्हणत दम दिला. त्यावेळी गार्डने दोन ते तीन कि.मी.पर्यंत तपोवन एक्स्प्रेस मागे घेतली आणि जखमी पडलेल्या तरुण दिसताच त्याला उपचारासाठी गार्डच्या डब्यात ठेवण्यात आले. रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या तरुणाला घेऊन तपोवन एक्स्प्रेस संभाजीनगरच्या दिशेने निघाली. दरम्यान या घटनेची माहिती रेल्वे प्रवासी सेनेचे संतोष सोमाणी यांना समजल्यानंतर त्यांनी तातडीने रेल्वे स्टेशनवर धाव घेऊन रुग्णवाहिकेला कळवले.