बलात्कार करणाऱ्याचा गळा चिरणाऱ्या महिलेची न्यायालयाने केली निर्दोष सुटका

सामना ऑनलाईन । मुंबई

२००९ साली बलात्कार करणाऱ्या पुरूषाचा गळा चिरणाऱ्या एका महिलेची मुंबईतील सत्र न्यायालयाने मंगळवारी निर्दोष सुटका केली. सदर महिलेने स्वसंरक्षणासाठी त्या पुरूषाची हत्या केल्याचे सांगत न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

पीडित महिला ही वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील भारत नगर झोपडपट्टीत तिच्या कुटुंबासोबत राहते. १३ ऑगस्ट २००९ च्या रात्री त्याच परिसरात राहणाऱ्या एका पुरूषाने तिच्या घरात घुसून तिला चाकूच्या जोरावर घराबाहेर आणले. त्यानंतर तो तेथील एका गोठ्यात तिला घेऊन गेला व तेथे तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारानंतर त्याने तिला मारून टाकण्याचा प्रयत्न केला व चाकूने तिच्या पोटावर वार केला. त्यावेळी स्वत:चा बचाव करण्यासाठी पीडित महिलेने त्याच्या हातातील चाकू हिसकावून घेत त्याचा गळा चिरला. त्यात त्या नराधमाचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी सदर महिलेने त्या पुरूषाविरोधात बलात्काराची तक्रार नोंदविली व स्वसंरक्षणासाठी त्याची हत्या केल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र सदर पुरूषाच्या पत्नीने मात्र त्या महिलेने नियोजित कट रचून तिच्या पतीची हत्या केल्याचा आरोप केला आहे. पीडित महिलेच्या नवऱ्याचा व तिच्या नवऱ्याचा संपत्तीवरून वाद सुरू होता या वादातूनच हत्या झाल्याचे तिने पोलिसांना सांगितले होते.

“महिलेची साक्ष, घटनास्थळावरील पुरावे, वैद्यकीय अहवाल यावरून सदर महिलेने स्वसंरक्षणासाठी त्या पुरूषाची हत्या केल्याचे स्पष्ट होत आहे. वैद्यकीय तपासणीत त्या पुरषाच्या पॅन्टवरून व महिलेच्या कपड्यांवरून पुरूषाचे शुक्राणू आढळून आले. तसेच महिलेच्या शरीरावर बऱ्याच जखमा आहेत. त्यामुळे त्या महिलेने स्वसंरक्षणासाठीच त्याची हत्या केली आहे. म्हणून तिची निर्दोष सुटका करण्यात येत आहे, ” असे सत्र न्यायालयाचे न्यायधीश एसएम भोसले यांनी सांगितले.