न्यायासाठी महिलेने रक्ताने लिहिलं मोदींना पत्र, भाजपच्या नेत्यावर केले आरोप

सामना ऑनलाईन । लखनौ

उत्तर प्रदेशच्या इटावामधील एका महिलेने भाजपच्या स्थानिक नेत्यावर जमीन हडपण्याचा आरोप केला आहे. बकेवर कस्ब्यात राहणाऱ्या महिलेने राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना रक्ताने पत्र लिहून न्याय मागितला आहे. तसेच न्याय देणे शक्य झालं नाही तर मला इच्छामरणाची परवानगी मिळावी, असं या महिलेने पत्रात म्हटलं आहे.

दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, महिलेची बकेवर ठाण्याजवळ काही जमीन होती. आपल्या जमिनीवर बांधकाम करण्यासाठी महिला ज्यावेळी गेली त्यावेळी भाजपचा नेता लालजी शर्माने तिला तेथून हुसकावलं आणि परत न येण्याची धमकी दिली. याप्रकरणी महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस स्टेशनमध्ये शर्माने आपला आपमान केल्याचाही आरोप महिलेने केला आहे.

पीडित महिलेने अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी फेऱ्या मारूनही काही फायदा झाला नाही. अखेर न्यायासाठी महिलेने राष्ट्रपती, पंतप्रधान आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी चिठ्ठी लिहीत न्यायाची मागणी केली.