ऐश्वर्या रायवरील तो मीम विवेक ऑबेरॉयला भोवणार, महिला आयोगाची नोटीस

64

सामना ऑनलाईन । मुंबई

लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर नेटकर्‍यांनी मीम्सच्या माध्यमातून फिरकी घेण्यास सुरूवात केली आहे. अशीच फिरकी घेणार्‍या मीम्सवाल्याचे कौतुक करत विवेक ऑबेरॉयने तो मीम पोस्ट केला होता. यामध्ये सलमान खान, ऐश्वर्या रॉय, अभिषेक बच्चन आणि त्यांची मुलगी आराध्याच्याही फोटोचा समावेश होता. यावर तो चांगलाच ट्रोल झाला. या ट्विटवर बॉलिवूडमधील सेलिब्रिटींनीही त्याला खडेबोल सुनावले. तर महिला आयोगाने या प्रकरणी विवेकला नोटीसही बजावली आहे.

विवेकने शेअर केलेल्या मीममध्ये ऐश्वर्याचा सलमानसोबत फोटो आहे त्याला ओपिनीयन पोल अशी कॅप्शन दिली आहे. त्यानंतर स्वतःचा आणि ऐश्वर्याचा फोटो आहे, त्याला एक्झिट पोल अशी कॅप्शन दिली आहे. तर तिसरा फोटो अभिषेक ऐश्वर्या आणि आराध्याचा फोटो आहे. त्यात आराध्याला अंतिम निकाल असे कॅप्शन दिले आहे. यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. पद्मश्री सन्मानित अभिनेत्रीचा हा अपमान आहे असे काहींनी म्हटले आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाने पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, “सोशल मीडियावर एक महिला आणि अल्पवयीन मुलीचा फोटो टाकून तुम्ही अपमान केला आहे. तुम्ही एक्झिट पोल आणि एका महिलेचे खाजगी आयुष्याची वाईट पद्धतीने तुलना केली आहे.” या पोस्टमध्ये तुम्ही महिलेचा अपमान केला असून त्याचे स्पष्टीकरण द्या असेही नोटीसमध्ये म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या