मोबाईलमधील खासगी फोटो व्हायरल झाल्याने महिलेची आत्महत्या

सामना ऑनलाईन। कोलकाता

मोबाईल हरवणे कोलकाता मधील एका विवाहीत महीलेच्या जीवावर बेतले आहे. मोबाईलमधील खासगी फोटो व्हायरल झाल्याने पीडित महीलेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आलीय. या घटनेवर सरकारी वकीलांसह सायबर तज्ज्ञांनीही चिंता व्यक्त केली असून महिलांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

पश्चिम बंगालमधील मिदनापुर जिल्हयात राहणाऱ्या या महिलेचा पती नोकरीनिमित्त ओडिशात राहतो. तर महिला आपल्या दोन मुलांसह कोलकातामध्ये राहत होती. २९ जानेवारीला ती मुलीला शाळेत सोडण्यासाठी जात असताना वाटेत तिचा मोबाईल हरवला. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी कॉलनीतच राहणाऱ्या चार तरुणांनी तिला मोबाईल आणून दिला. मोबाईल रस्त्यावर सापडला असे त्यांनी तिला सांगितले. मोबाईल मिळाल्यामुळे महिलेला खूप आनंद झाला व तिने त्या मुलांचे मनापासून आभारही मानले.

पण त्यानंतर या मुलांनी तिला मोबाईलवर कॉल केला व शरीरसुखाची मागणी केली. यामुळे संतप्त महिलेने त्यांना पोलिसांमध्ये तक्रार करु अशी वॉर्निंग दिली. यामुळे चवताळलेल्या मुलांनी तिला मोबाईलमधील तिचे खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांनी तिच्या मोबाईलमधील तिचे काही फोटो मॉर्फ करून व्हायरल केले. महिलेने नकार दिल्याने ते चौघेही चिडले होते. महिलेने दिलेल्या धमकीचा सूड म्हणून त्यांनी तिचे मॉर्फ केलेले फोटो शहरातील भिंतीवरही झळकवले.

बघता बघता महिलेचे फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले व तिच्या पतीपर्यंत पोहचले. पत्नीचे आक्षेपार्ह स्थितीतील फोटो बघून पतीही हादरला. त्याने फोनवर तिच्याकडे याबदद्ल चौकशी केली. तेव्हा तिने सगळा वृत्तांत त्याला सांगितला. यामुळे पती पत्नीमध्ये तणाव निर्माण झाला. शेजारीही महिलेलाच दोषी ठरवू लागले. ही बदनामी सहन न झाल्याने महिलेने १७ मार्चला आठ वर्षाच्या मुलाला व तीन वर्षाच्या मुलीसह स्वत:ला घरात कोंडले. त्यानंतर तिने गळफास लावून स्वत:चे आयुष्य संपवले. मात्र आत्महत्या करण्याआधी तिने १० पानांची ‘सुसाईड नोट’ लिहून ठेवली. त्यात तिने सगळ्या घटनेचा वृत्तांत लिहला होता. त्यावरून पोलिसांनी त्या चार नराधमांना अटक केली आहे. त्यांच्यावर भादंवि कलम ३०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर सीआयडीने ५७ दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल केली. हल्लीच तामलुक जिल्हा न्यायालयात या चारही नराधमांनी जामीन देण्यात यावा अशी याचिका दाखल केली होती. पण न्यायालयाने ती फेटाळली.
दरम्यान,सरकारी वकील बिपहाश चटर्जी यांनी न्यायालयात महिलेची १० पानांची ‘सुसाईड नोट’ वाचून दाखवली. ज्यात तिने तिच्यावरील ‘आपबिती’ तर मांडलीच त्याचबरोबर पतीसाठी मुलांसाठी मला जगायचे होते.पण तिच्याबरोबर झालेल्या घटनेमुळे तीची जगण्याची इच्छाच मेल्याचं तिने म्हंटले आहे. या घटनेनंतर सायबर तज्ज्ञांनी देशातील सर्व महिलांना मोबाईलमध्ये पासवर्ड ठेवण्याबरोबर खासगी फोटो न ठेवण्याचा सल्ला दिला आहे.