महिलांचा जन्म फक्त लग्नासाठी व पुरुषांच्या सुखासाठी नाही; ‘खतना’ प्रथेवरून कोर्टाने खडसावले

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

मुसलमान समाजातील ‘खतना’ या प्रथेवर सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत महिलांच्या खतना प्रथेवर देशभरात संपूर्णपणे बंदी घालण्यात यावी व यास अजामिनपात्र गुन्हा घोषित करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. सोमवारी यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने खतना प्रथेवर आपले परखड मत व्यक्त केले आहे. ‘महिलांचा जन्म हा फक्त लग्नासाठी आणि पुरुषांना खूश करण्यासाठी नसून त्यांच्याही काही इच्छा असू शकतात,’ असे परखड मत सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

या सुनावणीदरम्यान अटॉर्नी जनरल के.के. वेनगोपाल यांनीही खतना प्रथेवरील बंदीच्या याचिकेला समर्थन दिले. लग्न करून संसार थाटणे याशिवायही महिलांच्या इतरही जबाबदाऱ्या असतात. खतनासारख्या अनिष्ट प्रथा महिलांच्या गुप्ततेचा अधिकार उल्लंघन करणाऱ्या आहेत. ही प्रथा लैंगिक संवेदनशीलतेसाठी मारक ठरले. तसेच आरोग्यासाठीही हानीकारक आहे असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. पतीला खुश करावे ही जबाबदारी फक्त महिलांचीच का? असाही प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने विचारला आहे.

‘कोणत्याही अल्पवयीन मुलीच्या प्रायव्हेट पार्टना हात लावणे हा गुन्हा आहे. प्रथा असली तरीही या गुन्ह्याची संमती दिली जाऊ शकत नाही असे मत अॅडव्होकेट इंदिरा जयसिंह यांनी नोंदवले आहे. खतनासारख्या प्रथा या स्त्रियांचा स्वाभिमान धुळीला मिळवणाऱ्या आहेत असेही न्यायालयाने म्हटले आहे.

फर्स्ट पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, धर्माच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा खतना करणे गुन्हा आहे असे केंद्र सरकारने म्हटले आहे. तसेच या प्रथेवर बंदी आणली जावी या मताचे सरकार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. अल्पवयीन मुलीचा खतना केल्यास सात वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाचीही तरतूद करण्यात आल्याचेही केंद्राने म्हटले आहे.

Summery – Women do not live only for marriage and husbands supreme court speaks against female genital mutilation