नालासोपारा रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर महिलेने दिला गोंडस बाळाला जन्म


सामना प्रतिनिधी । वसई

नालासोपारा रेल्वे स्थानकात रविवारी सकाळी एका महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. नालासोपारा रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर अचानक महिलेला प्रसुती वेदना सुरु झाल्याने एकच धावपळ उडाली. त्यामुळे येथील स्टेशन अधिक्षकांनी प्रसंगावधान दाखवून महिला प्रवाशी आणि डॉक्टरच्या मदतीने तत्काळ धावून तीची प्रसुती सुखरूप पार पाडली. रेश्मा बेगम (26) असं या महिलेचे नाव असून आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती चांगली आहे. सध्या तिला वसई विरार शहर महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नालासोपारा पश्चिमेच्या हनुमान नगर येथे राहणारी रेश्मा बेगम ही गर्भवती महिला गोरेगाव येथे जाण्यासाठी नालासोपारा सेल्वे स्थानकात आली असता तिला अचानक प्रसुती वेदना सुरु झाल्या, आणि काही वेळातच रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावरच तिने सकाळी 9 वाजून 5 मिनिटांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला. यावेळी नालासोपारा स्टेशन अधीक्षक रामकेश मीना यांनी तत्काळ 108 क्रमांकावर संपर्क साधून डॉक्टरांना पाचारण केले, तसेच कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी धावले. त्यानंतर महिला प्रलाशांच्या व डॉक्टरांच्या मदतीने रेश्माची प्रसुती योग्य पद्धतीने पार पडली. तसेच तिला पुढील उपचारासाठी वसई विरार महानगरपालिकेच्या रुग्णालयात दखल करण्यात आहे. यावेळी रेल्वे स्थानकावरील महिला प्रवासी, डॉक्टर आणि रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेचे नागरिकांनी कौतुक केले