पावसासाठी गावकऱ्यांनी परिधान केला अनोखा वेश

सामना ऑनलाईन । भरतपुर

हिंदुस्थान कृषीप्रधान देश असल्यामुळे चांगला पाऊस व्हावा यासाठी अनेक यज्ञ, नवस, पूजापाठ, बेडकाचं लग्न असे नानाविध प्रकार केले जातात. मात्र छत्तीसगढ़च्या कोरियामधील लोकांनी चांगला पाऊस व्हावा, ढगांची समजूत काढता यावी यासाठी एक अनोखा उपाय शोधला आहे.

कोरियातील भरतपूरमध्ये लोकांनी विचित्र वेश परिधान केला होता. तिथे महिलांनी पुरुषांसारखा आणि पुरुषांनी महिलांसारखा वेश परिधान केला आहे. स्थानिक लोकांनी पावसासाठी प्रार्थना करत या विचित्र पध्दतीचा अवलंब केला आहे. याला अंधश्रद्धा म्हणा किंवा विश्वास, आपल्या भक्तांचं हे बदललेलं रूप पाहून इंद्रदेव प्रसन्न होतात का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

केवळ छत्तीसगढ़मध्येच पावसासाठी असे अनोखे प्रकार करणारे लोकं नाहीत. तर कर्नाटकमध्ये महादेव स्वामी नावाचे एक बाबा आहेत. ते जिथे जिथे जाऊन ध्यानसाधनेत तल्लीन होतात तिथे तिथे पाऊस पडतो असा लोकांचा समाज आहे.