लोकलमधून फेकलेल्या निर्माल्यातील नारळाने महिला जखमी

2

सामना ऑनलाईन । वसई

धावत्या लोकलमधून खाडीमध्ये निर्माल्य फेकल्यामुळे त्यातील नारळाचा फटका डोक्याला लागून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. पश्चिम रेल्वेवरील सफाळे आणि वैतरणा स्थानकादरम्यान वैतरणा खाडीपुलावर ही घटना घडली. रोहिणी विक्रांत पाटील असे जखमी महिलेचे नाव आहे.

पश्चिम रेल्वेच्या वैतरणा तसेच नायगाव-पाणजू खाडी पुलावरून लोकलप्रवासी निर्माल्याच्या पिशव्या नेहमी खाडीत फेकत असतात. बुधवारी डहाणूहून विरारच्या दिशेने येणाऱ्या लोकलमधील एका प्रवाशाने निर्माल्याची पिशवी खाडीमध्ये फेकली. मात्र त्या पिशवीमधील नारळ वैतरणा खाडी पुलावरून पायी पायी जाणाऱ्या रोहिणी पाटील यांच्या डोक्यात पडला. नरळाच्या जोरदार फटका बसल्याने जखमी झालेल्या रोहीणी चक्कर येऊन रेल्वे रुळाच्या बाजूला कोसळल्या. यावेळी त्यांच्यासोबत चालणाऱ्या नागरिकांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. पश्चिम रेल्वे मार्गावर लोकलमधून प्रवास करणारे अनेक प्रवासी निर्माल्याच्या पिशव्या धावत्या लोकलमधून खाडीत फेकत असतात. याचा फटका आजूबाजूने चालणाऱ्या नागरिकांना बसतो. त्यामुळे लोकलमधून निर्माल्य फेकण्यावर बंदी आणण्याची मागणी होत आहे.