मधमाशांच्या हल्ल्यात युवती जखमी

सामना प्रतिनिधी, यावल

तालुक्यातील साकळी येथे मधमाशांच्या हल्ल्यात एक १८ वर्षीय युवती गंभीर जखमी झाली आहे. बसस्थानकावर ही घटना घडली. अचानक मधमाशांचे पोळ उठल्याने येथे एकच धावपळ उडाली होती.

सावळी गावापासून बसस्थानक सुमारे एक किलोमीटर अंतरावर अंकलेश्कर- बऱ्हाणपूर राज्यमार्गावर आहे. या बसस्थानकाजवळील झाडावर असलेले मधमाशांचे पोळ अचानक उठले. मधमाशांनी या ठिकाणी असलेल्या नागरिकांवर हल्ला चढवला. यामुळे प्रचंड धावपळ उडाली.

यावेळी जळगावला जाण्यासाठी बसस्थानकावर उभ्या असलेल्या तेजस्वीनी दामोदर नेवे (१८) या युवतीस मधमाशांनी डोक्यावर चावा घेतला. घटनास्थळावरून जखमी अवस्थेत काही जणांनी तिला गावातील खासगी रुग्णालयात उपचार्थ दाखल केले. गेल्यावर्षीदेखील याच बसस्थानकावर मधमाशांच्या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले होते. त्यात तलाठ्यांचाही समावेश होता.