भाजप नेत्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेचा गूढ मृत्यू

सामना ऑनलाईन। लखनौ

उत्तर प्रदेशमधील बिजनौर येथे एका स्थानिक भाजप नेत्यावर बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेचा (३६) संशयास्पद मृत्यू झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. विजय सिंह असे या भाजप नेत्याचे नाव असून सदर महिलेने सिंहची आपल्यावर वाईट नजर असून त्याने आपल्यावर बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी तिने मुख्य दंडाधिकारी न्यायालयात याचिका दाखल केली होती. पुढील आठवड्यात त्याची सुनावणी सुरु होणार आहे. पण त्याआधीच महिलेचा मृत्यू झाल्याने यामागे नक्कीच काहीतरी काळेबेरे असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

सदर महिला विवाहीत असून पाच मुलांची आई आहे. सिंह याच्याविरोधात सर्वप्रथम तिने पोलिसात धाव घेतली होती. पण पोलिसांनी तिची साधी तक्रारही नोंदवून घेतली नाही. यामुळे तिने सिंह विरोधात मुख्य दंडाधिकारी न्यायालयात याचिका दाखल केली होती. पुढील आठवड्यापासून या प्रकरणाची सुनावणी सुरु होणार आहे. यामुळे महिला सिंह याच्याविरोधातील पुरावे गोळा करत होती. पण सोमवारी २ ऑक्टोबरला ती अचानक बेपत्ता झाली. तेव्हापासून घरातले तिचा शोध घेत होते. मंगळवारी सकाळी तिच्या घरापासून २५० मीटर अंतरावर एका ऊसाच्या शेतामध्ये तिचा मृतदेह आढळला. तिच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा होत्या तसेच तिच्या गळ्यावरही व्रण होते. यावरुन तिची गळा दाबून हत्या करण्यात आली असावी अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबद्दल पोलिसांकडे गेल्यावर त्यांनी तक्रार नोंदवण्यासही टाळाटाळ केली. यामुळे गावचे माजी सरपंच गुरु सेवक यांनी जिल्हयातील सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांना याप्रकरणात लक्ष घालण्याची पत्र लिहून विनंती केली आहे.

दरम्यान या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचा दावा सिंह याने केला आहे. माजी सरपंच गुरु सेवक एका गरीब व्यक्तीची जमीन हडपण्याचा प्रयत्न करत होता. त्यास मी विरोध केल्यानेच या महिलेच्या प्रकरणात मला गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे असे सिंह याने म्हटले आहे.