कार्यालयांमध्ये लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करा!

सामना प्रतिनिधी । मुंबई 

कार्यालयांमध्ये महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना सेवेतून तत्काळ बडतर्फ करावे असे स्पष्ट मत उद्योग क्षेत्रांतील मान्यवरांनी ‘कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचाराला प्रतिबंध करणे’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेमध्ये व्यक्त केले. महिलांसाठी सुरक्षित कार्यस्थळांची निर्मिती करणे तसेच कार्यालये-उद्योगांच्या ठिकाणी लैंगिक अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी जागतिक व्यापार केंद्र, मुंबई आणि ‘एम्प्लॉयर्स फेडरेशनऑफ इंडिया’ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन केले होते.

कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचार थांबविण्यासाठी परिणामकारक उपाययोजनांबाबत या कार्यशाळेत चर्चा झाली. कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचार थांबविण्यासाठी प्रभावी यंत्रणा कार्यान्वित हवी असे मत रिलायन्स इंडस्ट्रीजचे विनय किर्लोस्कर यांनी व्यक्त केले. ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष विजय कलंत्री यांनी कार्यालयीन स्थळी महिलांना मिळणारे लाभ आणि संधी यावर संबंधितांना श्वेतपत्रिका काढणे आवश्यक आहे असे सांगितले. तर लैंगिक अत्याचार करणाऱयांविरुद्ध सेवेतून बडतर्फी, बदली, वेतनवाढ रोखणे आदी पावले उचलणे शक्य आहे, असे यावेळी अॅड. साना हकीम म्हणाल्या.

हा तर साथीच्या रोगासारखा पसरलेला

लैंगिक अत्याचार हा साथीच्या रोगासारखा असून तो फक्त हिंदुस्थानात नसून तो जगभर पसरलेला आहे असे मत मनोविकारतज्ञ स्मृती मक्कर मिधा यांनी व्यक्त केले. कायदा सल्लागार शिवांगी प्रसाद यांनी यावेळी महिला आणि मुलांचे हक्क, कार्यालयांतील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदे यासंदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले. ‘एम्प्लॉयर्स फेडरेशनऑफ इंडिया’चे महासंचालक विजय पडते, मुंबई उच्च न्यायालयातील वकील आणि बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स ऍंड इंडस्ट्रीचे सल्लागार लॅन्सी डिसोझा, इडोब्रो इम्पॅक्ट सोल्युशन्सच्या व्यवस्थापकीय संचालिका करोन शाइव्हा, जागतिक व्यापार केंद्र, मुंबईचे कार्यकारी संचालक श्री. वाय. आर. वरेरकर यांनीही आपली मते मांडली.