वसतिगृह नसल्याने पौढ महिला शिक्षणापासून वंचित

शुभम कुलकर्णी । संभाजीनगर

स्त्री शिक्षणाच्या कैवारी सावित्रीबाई  फुले यांच्या लेकींना सुविधा नसल्याने शिक्षणापासून वंचित रहावे लागते. अख्ख्या मराठवाड्यात एकच प्रौढ महिला विद्यालय आहे.  तेथेही  वसतिगृह नसल्याने निराधार, परित्यक्त्यांना प्रवेश घेता येत नाही. तर, समुपदेशक आणि आया नसल्याने येथील शिक्षिकांना दुहेरी भूमिका पार पाडावी लागते.

शहरातील समर्थनगर परिसरात, गांधी भवनजवळ प्रौढ महिला विद्यालय आहे. या शाळेची स्थापना एस. आर. देशपांडे गुरुजी यांनी १९५८ साली केली. येथे वय वर्ष १५ पूर्ण असलेल्या निराधार, परित्यक्त्या, सुधारगृहातील मुली -महिलांना शिक्षण दिले जाते.  संपूर्ण मराठवाड्यात एकच प्रौढ महिला विद्यालय आहे.  इथे जवळच्या जिल्ह्यातून महिला शिक्षण घेण्यासाठी येतात. पण, वसतिगृह नसल्याने त्यांना शिक्षणापासून दूर रहावे लागते.

सावित्रीच्या लेकींना शिकण्याची इच्छा आहे. पण, शिक्षण विभागाला सुविधा देण्याची गरज वाटत नाही. या शाळेला इतर शाळांप्रमाणेच गृहीत धरले जाते. शासनाच्या संगणकीकृत प्रणालीत प्रौढ महिला विद्यालय बसतच नाही. प्रौढ महिला विद्यालयातील शिक्षिका वेळप्रसंगी आया, समुपदेशक, मदतगार आणि पालक अशा विविध भूमिका पार पडतात.

शासनाच्या संगणकीकृत प्रणालीत त्रुटी
शासनाच्या संगणकीकृत प्रणालीत नाव टाकताना अनेक अडचणी येतात. कारण, आमची शाळा चार वर्षांचा संक्षिप्त अभ्यासक्रम शिकवते. त्यामुळे इतर शाळांप्रमाणे आमच्या विद्यार्थांचे सलग वर्ग नसतात. त्यासाठी शासनाने संगणकीकृत प्रणालीत आमच्या शाळेसाठी एक पर्याय करावा.
– सौ. मोरे सहशिक्षिका

शिक्षिकांच्या मागण्या
शासनाने वसतिगृह द्यावे, शाळेला विशेष दर्जा,  प्रवेश देण्याचा कालावधी वाढवावा, शिक्षण भत्ता, प्रवसाची सोय, शाळेला आया, पाळणाघर आणि समुपदेशक असावा, संक्षिप्त अभ्यासक्रम हा आकलनावर असावा, शासनाच्या संगणकीकृत प्रणालीत प्रौढ महिला विद्यालयासाठी पर्याय करावा.

वसतिगृह नसल्याने परितक्त्या राहणार कुठे
आमच्या शाळेत जालना जिल्ह्यातील प्रौढ महिला प्रवेश घेण्यासाठी येतात, पण शाळेत वसतिगृह नसल्याने राहणार कुठे, हा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहतो आणि त्या प्रवेश घेण्याचे टाळतात. येथून शिकलेल्या अनेक महिला नगरसेवक, सरपंच, मुख्याध्यापिका, शिक्षिका, प्रशासकीय अधिकारी झालेल्या आहेत. तर काही महिला उच्च पदवीचं शिक्षण घेत आहेत.
 मुख्याध्यापिका जयश्री खिस्ती