हिंदुस्थान-चीनमध्ये जेतेपदाची लढाई

सामना ऑनलाईन । जपान

हिंदुस्थानच्या महिला हॉकी संघाने शुक्रवारी शानदार कामगिरी सुरूच ठेवत आशिया कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. गुरजीत कौर, नवज्योत कौर व लालरेमसियामी  यांनी केलेल्या दमदार गोलच्या जोरावर हिंदुस्थानच्या महिला संघाने गतवेळचा विजेता जपानवर ४-२ असा दिमाखदार विजय मिळवत तब्बल आठ वर्षांनंतर फायनलमध्ये धडक मारली. आता येत्या रविवारी होणाऱया जेतेपदाच्या लढतीत हिंदुस्थान चीनला भिडणार आहे. चीनने गतवेळच्या उपविजेत्या दक्षिण कोरियाला ३-२ असे हरवले. जपान व दक्षिण कोरिया आता तिसऱया स्थानासाठी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.

गुरजीत कौरने याही लढतीत आपला सदाबहार फॉर्म कायम ठेवला. तिने सातव्या व नवव्या मिनिटाला गोल करीत हिंदुस्थानच्या विजयात पुन्हा एकदा मोलाची भूमिका बजावली. त्यानंतर नवज्योत कौरने नवव्या व लालरेमसियामीने ३८व्या मिनिटाला गोल करीत हिंदुस्थानचा विजय निश्चित केला. जपानकडून शिहो सुजीने १७ व्या आणि युई इशीबाशीने २८व्या मिनिटाला गोल करीत विजयासाठी प्रयत्न केले. दरम्यान, चीनने अन्य उपांत्य लढतीत दक्षिण कोरियाला ३-२ अशा फरकाने हरवले. लियांग, झोंग, लुओ यांनी चीनसाठी गोल केले.

२००९ च्या फायनलची पुनरावृत्ती

हिंदुस्थान व चीन यांच्यामध्ये २००९ सालामध्ये झालेल्या आशिया कपची अंतिम फेरीची लढत झाली होती. त्या लढतीत चीनने हिंदुस्थानला ५-३ असे हरवून अजिंक्य होण्याचा मान संपादन केला होता. आता त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी संधी हिंदुस्थानकडे असणार आहे. चीनने दोन वेळा आशिया कप जिंकला असून हिंदुस्थानने २००४ साली या स्पर्धेच्या जेतेपदावर मोहोर उमटवली आहे. तसेच दोन वेळा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. हिंदुस्थानी संघ प्रत्येकी दोन वेळा तिसऱया व चौथ्या स्थानी राहिला आहे.