दारूबंदीसाठी महिलांची ग्रामपंचायतीवर धडक

सामना प्रतिनिधी, रावेर

गावात दारूबंदी करावी यासाठी महिलांनी विवरे बुद्रुक व विवरे खुर्द ग्रामपंचायत कार्यालयावर धडक दिली. अवैध दारुविक्री व गावात संपूर्ण दारुबंदी करावी, या मागणीचे निवेदन ग्राम पंचायत प्रशासनाला दिले.

ग्रामपंचायत विवरे बुद्रुक व विवरे खुर्द या दोन्ही ग्रामपंचायतीवर महिलांनी लेखी अर्ज देऊन गावात संपूर्ण दारूबंदी करावी अशी मागणी केली. गावात मद्य प्राशन करीत हाणामारीचे प्रमाण वाढले आहे. गावात अल्पवयीन मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत बहुतांश नागरिकांना दारूचे व्यसन आहे.

लोक दारूच्या आहारी गेल्यामुळे महिला वर्गाला घरात त्रास सहन करावा लागत आहे, अशा स्वरूपाचा तक्रार अर्ज महिलांनी ग्रामपंचायतीला दिला आहे. दारुबंदीमुळे अनेकांचे उद्ध्वस्त होणारे संसार सावरता येतील. अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी महिलांनी केली.