वीटभट्टी मजुराला विष्ठा खायला लावणाऱ्या मालकाला अटक

सामना ऑनलाईन, पुणे

वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुराला विष्ठा खायला घालणाऱ्या मालकाला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. कामावरून झालेल्या वादातून या मालकाने आपल्याला आधी शिवीगाळ केली आणि नंतर विष्ठा खायला लावली असा आरोप सुनील पवळे (वय-22 वर्ष, राहणार धाराशिव) याने केला आहे. वीटभट्टी मालक संदीप पवार (वय- 42, जांबेगाव, मुळशी) याला पोलिसांनी अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत अटक केली आहे. सदर प्रकार मुळशी तालुक्यातील जांबे येथे घडला आहे.

सुनील पवळे आणि त्याचं कुटुंब पवार याच्या वीटभट्टीवर गेले 2 वर्ष काम करत आहे. बुधवारी दुपारी 2 च्या सुमारास पवळे कुटुंब जेवायला बसलं होतं. संदीप पवार याने त्यावेळी ताबडतोब कामाला लागा असं पवळे आणि कुटुंबीयांना सांगितलं. यावेळी पवळेने जेवण होत आलंय, झालं की पुन्हा कामाला सुरुवात करतो असं उत्तर दिलं. यावरून पवार संतापला आणि त्याने पवळे कुटुंबाला शिव्या द्यायला सुरुवात केली. पवळे यानेही पवारला उलट शिव्या दिल्या आणि वाद वाढत गेला

पवारने त्याच्या बायकोला एका भांड्यात विष्ठा आणायला सांगितली. आणली नाही तर हाणेन अशी धमकीही त्याने बायकोला दिली असा आरोप तक्रारदाराने केला आहे. पवारच्या बायकोने विष्ठा आणल्यावर ती पवारने पवळेला खायला सांगितली. यानंतर पवारने पवळेला मारायला सुरुवात केली आणि विष्ठा खा म्हणून जबरदस्ती केली. घाबरलेल्या पवळेने कशीबशी थोडी विष्ठा खाल्ली. जेव्हा हा प्रकार घडला तेव्हा भट्टीवरील बाकीचे कर्मचारीही बघत होते, मात्र एकानेही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला नाही.

या प्रकारामुळे घाबरलेल्या सुनील पवळे आणि कुटुंबाने वीटभट्टीवरून पळ काढला आणि वाकड इथल्या त्यांच्या नातेवाईकांच्या घरी आसरा घेतला. काही सामाजिक संस्थ्यांच्या मदतीने पवळेने पवारविरोधात तक्रार नोंदवली. गुरुवारी संध्याकाळी पवार याला पोलिसांनी अटक केली. पवार याच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे की पवळेने खोटी तक्रार दाखल केली आहे. जेव्हा ही घटना घडली तेव्हा सुनील पवळे दारू प्यायला होता आणि दारुच्या नशेत त्याने विष्ठा खाल्ली असावी, असा दावाही पवार यांच्या नातेवाईकांनी केली आहे. सुनील पवळे याला आपण सातत्याने आर्थिक मदत केली होती, त्याच्या बहिणीच्या लग्नासाठीही संदीप पवार याने मदत केल्याचं पवार याची बहीण सविता बोडके यांनी सांगितलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून सखोल चौकशीशिवाय कोणताही निष्कर्ष काढणं चूक असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.