…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

देशाची राजधानी नवी दिल्लीत उद्या 15 नोव्हेंबरपासून जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेला प्रारंभ होत आहे. 24 नोव्हेंबरपर्यंत चालणाऱया या स्पर्धेत 73 देशांच्या 300हून अधिक महिला बॉक्सर्स सहभागी होणार आहेत. हिंदुस्थानी क्रीडा शौकिनांचे लक्ष लागले आहे ते पाच वेळा विश्वविजेतेपद पटकावणाऱया मेरी कोमच्या स्पर्धेतील कामगिरीवर. मेरी कोमने या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्यास ती सहा वेळा जागतिक विजेतेपद पटकावण्याचा पराक्रम करणारी जगातील पहिली महिला बॉक्सर ठरणार आहे. आपण वयाच्या चौतीसतीतही पूर्ण फिट असून 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा निर्धार मेरीने व्यक्त केला आहे.

mary-kom-1

मेरी कोमला गेल्या आठ वर्षांत जागतिक अजिंक्यपद मुष्टियुद्ध स्पर्धेत जेतेपद पटकावता आलेले नाही. यंदाच्या स्पर्धेतही सुवर्णपदकाची तिला आपला खेळ उंचावावा लागणार आहे. तिने याआधी 2205 मध्ये 45 किलो गटात तर 2005,2006 आणि 2008 अशी तीनदा 46 किलो गटात आणि 2010 मध्ये 48 किलो वजनी गटाचे जगजेतेपद पटकावण्याचा पराक्रम केला आहे. आता सहाव्यांदा तिने सुवर्णपदक मिळवल्यास तिची ती विक्रमी कामगिरी ठरणार आहे.

बॉक्सिंग हा इनडोअर खेळ आहे. त्यामुळे दिल्लीच्या प्रदूषित वातावरणाचाही स्पर्धेत सहभागी झालेल्या बॉक्सर्सच्या कामगिरीवर मोठा विपरीत परिणाम होईल असे मला तरी वाटत नाही.
– मेरी कोम