World Cup 2019 : हिंदुस्थानचे लक्ष्य ‘विजयाची हॅटट्रिक’, न्यूझीलंडला हवाय सलग चौथा विजय

8
india-vs-new-zealand

सामना ऑनलाईन । नॉटिंगहॅम

वर्ल्ड कपमध्ये बुधवारपर्यंत पावसाचा फटका तीन लढतींना बसला असून आज हिंदुस्थान-न्यूझीलंड यांच्यामध्ये होणाऱ्या लढतीतही पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे या लढतीतही उभय संघांना प्रत्येकी एक गुण मिळण्याचीच शक्यता निर्माण झालीय. लढत पूर्ण झाल्यास विराट हिंदुस्थानी संघ सलग तिसऱया तर न्यूझीलंड संघ सलग चौथ्या विजयासाठी सर्वस्व पणाला लावताना दिसेल.

कोणाला मिळणार संधी?
अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे शिखर धवन पुढील किमान तीन लढतींना मुकणार आहे. त्यामुळे आज होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत लोकेश राहुलला सलामीला पाठवण्यात येईल. पण त्याच्याऐवजी मधल्या फळीत कोणता फलंदाज खेळेल याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. दिनेश कार्तिक आणि विजय शंकर यांच्यामध्ये या स्थानासाठी चुरस असेल. रवींद्र जाडेजालाही ‘लॉटरी’ लागू शकते. इतर जागांमध्ये बदल होण्याची चिन्हं नाहीत.

इनडोअर सराव
येथे सतत पडणाऱया पावसामुळे दोन्ही संघांनी इनडोअरमध्ये सराव करायला प्राधान्य दिले आहे. हिंदुस्थानच्या खेळाडूंनी जिममध्ये वर्कआऊट केला. गुरुवारी उपाहारापर्यंत पावसाच्या सरी येणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. मात्र गेले काही दिवस पडत असलेल्या सततच्या पावसामुळे मैदान व खेळपट्टी खेळण्याजोगी असेल का, हाही यक्षप्रश्न आहे.

आजची लढत
हिंदुस्थान – न्यूझीलंड
नॉटिंगहॅम, दुपारी 3 वाजता

आपली प्रतिक्रिया द्या