हिंदुस्थानला धक्का, धवन वर्ल्ड कपमधून बाहेर; पंतला मिळणार संधी

9

 सामना ऑनलाईन । ओव्हल

दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांना धूळ चारणाऱ्या हिंदुस्थानी क्रिकेट संघाला मंगळवारी मोठा धक्का बसला. ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध शतकी खेळी करीत टीम इंडियाला दिमाखदार विजय मिळवून देणारा शिखर धवन अंगठय़ाला झालेल्या दुखापतीमुळे वर्ल्ड कपमधून बाहेर गेला आहे. त्याला तीन आठवडय़ांच्या विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. आता त्याच्याऐवजी पर्यायी खेळाडू म्हणून रिषभ पंतला संधी मिळण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

राहुल, शंकर, दिनेश यांच्यापैकी कोण खेळणार?

शिखर धवनचा पर्यायी खेळाडू 48 तासांच्या आत इंग्लंडमध्ये दाखल झाल्यानंतरही त्याला गुरुवारी न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या लढतीत खेळता येणार नाही. त्यामुळे या लढतीत लोकेश राहुल, विजय शंकर व दिनेश कार्तिक यांच्यापैकी कोणाला अंतिम अकरामध्ये संधी मिळतेय हे पाहणे रंजक ठरणार आहे.

डावखुरा खेळाडूला पसंती

शिखर धवन हा डावखुरा फलंदाज आहे. त्याच्याव्यतिरिक्त हिंदुस्थानी संघात कुलदीप यादव व रवींद्र जाडेजा हे डावखुरे फलंदाज आहेत. रवींद्र जाडेजा सहा ते आठ या दरम्यान फलंदाजी करतो, तर कुलदीप यादव हा बहुतांशी वेळा अखेरच्या स्थानावर फलंदाजीला येतो. त्यामुळे संघाचा समतोल राखण्यासाठी डावखुऱ्या रिषभ पंतचीच टीम इंडियात वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. रिषभ पंतला अंतिम पंधरा जणांच्या चमूत स्थान देण्यात आले नाही. त्यानंतर चोहोबाजूंनी निवड समितीवर टीका करण्यात आली होती. रिषभ पंतसह अंबाती रायुडू, श्रेयस अय्यर यांनाही संधी मिळू शकते.

आपली प्रतिक्रिया द्या