मोरोक्कोचा खेळ खल्लास

सामना ऑनलाईन ,मॉस्को

पहिल्या लढतीत संस्मरणीय हॅटट्रिक करणाऱ्या सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोने बुधवारी पुन्हा एकदा जबरदस्त कामगिरी करीत पोर्तुगालला फिफा वर्ल्ड कपमध्ये ‘ब’ गटात सलग दुसरा विजय मिळवून दिला. ख्रिस्तीयानो रोनाल्डोने चौथ्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे पोर्तुगालने मोरोक्कोला १-० असे हरवले आणि अंतिम १६ मध्ये धडक मारण्याच्या दिशेने पाऊल टाकले. ख्रिस्तियानो रोनाल्डोने कारकीर्दीतील ८५ वा गोल करीत युरोप खंडातून सर्वाधिक गोल करणाऱ्याच्या यादीत पहिल्या स्थानावर झेप घेतली. याचसोबत सलग दोन पराभवांनंतर मोरोक्कोचा संघ या स्पर्धेतून बाद झाला. साखळीतच आव्हान संपुष्टात येणारा मोरोक्को हा पहिलाच संघ ठरलाय.

ख्रिस्तियाना रोनाल्डोने चौथ्या मिनिटाला हेडरवर अफलातून गोल करीत या वर्ल्ड कपमधला चौथा तर कारकीर्दीतला ८५ वा गोल केला. यावेळी त्याने हंगरीच्या फेरेन्क पुसकास याच्या ८४ गोलना मागे टाकले. आता पोर्तुगालच्या दिग्गज खेळाडूला इराणच्या अली डेईच्या सर्वाधिक १०९ गोलचा विक्रम खुणावतोय. तसेच पोर्तुगालचा साखळी फेरीचा अखेरचा सामना २५ जून रोजी इराणशी होणार आहे.

capture-1