विश्वचषक नेमबाजी स्पर्धा; मनू–सौरभ आणि अंजुम–दिव्यांश जोडय़ांचे सोनेरी यश

2

सामना ऑनलाईन । बीजिंग

चीनमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत हिंदुस्थानने गुरुवारी सुवर्णपदकाचा डबल धमाका केला. अंजुम मौदगिल आणि दिव्यांशसिंग पन्वर या जोडीने 10 मीटर एअर रायफल, तर मनू भाकेर व सौरभ चौधरी या जोडीने 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात हे सोनेरी यश संपादन केले.

मनू आणि सौरभ जोडीने यजमान चीनच्या जियांग रानक्सिन व पेंग वेई या जोडीचा अंतिम फेरीत 16-6 असा धुव्वा उडवून सुवर्ण पदकावर नाव कोरले. मनू आणि सौरभ जोडीला पात्रता फेरीमध्ये 482 गुणांसह पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते, मात्र अंतिम फेरीत या जोडीने अधिक एकाग्र खेळ करीत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. मनूने मिश्र दुहेरीमध्ये सुवर्णपदक पटकावले असले तरी तिला महिलांच्या 10 मी. एअर पिस्तूल प्रकारात चांगली कामगिरी करता आली नाही. या स्पर्धेच्या पात्रता फेरीचा अडथळाही तिला पार करता आला नव्हता, मात्र मिश्र दुहेरी प्रकारामध्ये मनूने सौरभबरोबर खेळताना ही कसर भरून काढली. मनू व सौरभ जोडीचे हे सलग दुसरे सुवर्णपदक होय. याआधी फेब्रुवारीमध्ये नवी दिल्लीत झालेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतही या जोडीने सुवर्णवेध साधला होता.

अंजुम मौदगिल आणि दिक्यांशसिंग पन्वर या जोडीने 10 मीटर एअर रायफल प्रकारात हिंदुस्थानला स्पर्धेतील पहिले सुवर्ण पदक जिंकून दिले. अंजुम आणि दिव्यांश या जोडीने चीनच्या लिऊ रुक्सुअन आणि यांग हाओरन या जोडीवर अटीतटीच्या लढतीत 17-15 असा विजय मिळवला आणि सुवर्ण पदक आपल्या नावावर केले. खरं तर आधी चीनच्या जोडीकडे 13-11 अशी दोन गुणांची आघाडी होती, मात्र अंजुम आणि दिव्यांशने जबरदस्त पुनरागमन करत 15-15 अशी बरोबरी साधली. यानंतर चिनी जोडीला बॅकफूटला ढकलत हिंदुस्थानी जोडीने 17-15 अशी आघाडी घेत सुवर्ण पदकावर मोहर उमटविली. रशियाच्या युलिया कारिमोव्हा आणि ग्रिगोरी शामकोव्ह जोडीला कास्य पदकावर समाधान मानावे लागले.