अलिबागचे ‘जेरुसेलम गेट’ होणार जागतिक पर्यटनस्थळ

सामना प्रतिनिधी । अलिबाग

परागंदा झालेल्या ज्यू लोकांनी हिंदुस्थानच्या भूमीवर पहिल्यांदा ज्या ठिकाणी पाय ठेवले ते अलिबाग तालुक्यातील नवगाव येथील ‘जेरुसलेम गेट’ जागतिक पर्यटनस्थळ म्हणून विकास केला जाणार आहे. या स्थळाचा विकास करताना स्मृतिस्तंभाची बांधणी, परिसराचे सुशोभीकरण, विद्युत व्यवस्था केली जाणार आहे. यासाठी एक ट्रस्ट स्थापन केला जाणार असून पुरातत्त्व विभागाच्या तांत्रिक अडचणी येऊ नयेत यासाठी इतिहास तज्ञांचा सल्ला घेतला जाणार आहे. इस्त्रायलमधून आलेल्या ज्यू बांधवांनी मकरसंक्रांतीनिमित्ताने नवगाव या ठिकाणी भेट देत हिंदुस्थानातील या आश्रयस्थळाचा विकास करण्याचा संकल्प जाहीर केला आहे.

साधारण दोन हजार वर्षांपूर्वी भरकटलेल्या जहाजाद्वारे इस्त्रायली लोक आताच्या अलिबाग तालुक्यातील नवगाव या ठिकाणी आश्रयाला उतरली होती. आता ज्यू लोक येथून इस्त्रायलमध्ये गेलेल्या घटनेला ५० वर्षांपेक्षाही जास्त कालावधी उलटून गेला आहे. तरीही त्यांचे आश्रयस्थळाशी असलेले नाते अजिबात तुटलेले नाही. रविवारी हेच चित्र नवगाव येथे पहायला मिळाले. इस्त्रायलमधील २०० जणांनी नवगावला भेट दिली. यामध्ये अमेरिका, फ्रान्स या ठिकाणी स्थायिक झालेले ज्यू बांधवही होते. आलेले बहुतांशजण चांगल्या मराठीतून बोलत होते. येथे आल्यानंतर त्यांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. त्यांचे जुने सहकारी भेटल्याने अनेकजण या जुन्या आठवणीने भारावून गेले होते.

ज्यू धर्मीयांकर जगातील अनेक देशांमध्ये अत्याचार झाले. मात्र हिंदुस्थानात आलेल्या ज्यू धर्मीयांना सन्मानाची वागणूक मिळाली. दोन हजार वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत हा समाज येथील इतर समाजाशी पूर्णपणे एकरूप झाला. आजच्या घडीला जगभर दहशतवादी हल्ले काढत असताना ‘जेरुसलेम गेट’ हे जागतिक शांततेचे प्रतीक होईल.
– जॉनाथॉन सोलमन, इस्त्रायल.

दोन धर्मांमध्ये कसे नाते असावे याचे प्रतीक म्हणून ‘जेरुसलेम गेट’ हे स्थळ विकसित होऊ शकते. जागतिक शांततेसाठी हे एक आदर्श असे नाते आहे. आश्रयाला आलेल्या ज्यू धर्मीयांना येथील स्थानिक समाजाने प्रेमाने आपलेसे केले. याची नोंद या स्थळाच्या माध्यमातून घेतली जाईल.
– विजू पेणकर, माजी भारत श्री- १९७२.